कर्णबधीर प्रमाणपत्रासाठी पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

धुळे (28 मार्च 2025) : कर्णबधीर प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना धुळ्यातील खाजगी पंटराला धुळे एसीबीने शुक्रवार, 28 मार्च रोजी अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत. कमलाकर उत्तम महानोर (39, रा.खंडेराव मंदिराजवळ, शेलारवाडी चित्तोड रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे लाचेचा सापळा हा धुळ्यातील महाविद्यालयातील ओपीडीजवळ यशस्वी करण्यात आला. आरोपीच्या चौकशीनंतर अनेकांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
असे आहे लाच प्रकरण
66 वर्षीय तक्रारदार यांचे नातेवाईक पीडित हे कर्णबधीर आहेत. पीडित यांचे कर्णबधिर प्रमाणपत्र मिळण्याकरता ऑनलाईन अर्ज करण्यात आला व त्याप्रमाणे महाविद्यालयात जाऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार व पीडित हे कर्णबधीर प्रमाणपत्राच्या चौकशी करीता धुळ्यातील वैद्यकीय भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात गेले असता कर्णबधिर प्रमाणपत्र मिळवून देण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांच्या नावे आरोपी कमलाकर 2महानोर यांनी शुक्रवारी पाच हजारांची लाच मागितली व साडेचार हजार रुपयात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ओपीडीजवळ आरोपीने लाच स्वीकारताच त्यास दबा धरून बसलेल्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.