गुढीपाडव्याला भुसावळात दहा कोटींवर उलाढाल

अनेकाचां नव्या घरा प्रवेश : नवीन दुचाकी, चारचाकी रस्त्यावर


भुसावळ (1 एप्रिल 2025) : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलली होती. सकाळपासूनच नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. विशेषतः सोन्याचे दागिने, दुचाकी, इलेक्ट्रिक वाहने, टीव्ही तसेच चैनीच्या वस्तूसह श्रीखंड, आम्रखंड, बासुंदीच्या खरेदीला मोठी गर्दी होती. दिवसभर झालेल्या उलाढालीचा आकडा तब्बल 10 कोटींच्या घरात होता. दुचाकीसह सोन्याचे दागिणे खरेदीला अधिक पसंती होती.

ग्राहकांच्या गर्दीने फुलली बाजारपेठ
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त दिवसभर होता. त्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली. गुढीपाडवा हा नवचैतन्य आणि उत्साहाचा सण मानला जातो. यंदाही बाजारपेठांमध्ये झालेल्या प्रचंड खरेदीमुळे व्यापार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. गुढी उभारण्यासाठी लागणारे साखरेचे हार, कंगण यालाही अधिक मागणी होती. फुले, हार, केळीची पाने विकत घेण्यासाठी सुध्दा गर्दी होती. सकाळपासूनच बाजारपेठ ग्राहकांनी भरली होती. मोठ्या आकारातील टीव्ही, एसी, मोठे फ्रिज याला अधिक मागणी होती. वाढत्या तापमानामुळे एसी खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल होता. अनेक ग्राहकांनी सोलर यंत्रणा बसविण्यासाठी सुध्दा चौकश्या केल्यात. किती वॅटला किती खर्च येणार? किती सबसीडी मिळणार याची चौकशी केली जात होती.


दुचाकी खरेदीसाठी गर्दी
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने वाहन खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध वाहन विक्रेत्यांकडून 370 हून अधिक मोटरसायकलींची विक्री झाली. त्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचाही मोठा वाटा होता. ग्राहकांनी अधिककरून स्कुटरची खरेदी केली. बॅटरीगाड्यांना सुध्दा प्राधान्य दिले. दुचाकी विक्रीतून सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. विविध शोरूमच्या बाहेर मंडप टाकण्यात आले होते. ग्राहकांनी 12 वाजेपूर्वीच वाहनांची खरेदी केली. ग्रामीण भागात सुध्दा जास्त प्रमाणात गाड्यांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

श्रीखंड, आम्रखंडाला मागणी
गुढीपाडव्याला श्रीखंड आणि आम्रखंड खाण्याची परंपरा असल्याने शहरातील डेअरी, मॉल आणि सुपर शॉपमध्ये या पदार्थांची मोठी खरेदी झाली. यंदा तब्बल दोन किलोपेक्षा अधिक श्रीखंड आणि आम्रखंडाची विक्री झाली. गेल्या वर्षी हा आकडा 1500 ते 1800 किलो होता. तसेच बासुंदी, रबडी आणि गोड पदार्थांनाही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीखंड, आम्रखंडासह अन्य मिष्ठांनाच्या विक्रीतून सुमारे पाच लाखांची उलाढाल झाली.

शहरातील सराफा बाजार गजबजला
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने खरेदीला महत्व असते. यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. रत्नांची अंगठी, मंगळसूत्र, चेन, बांगड्या, कानातले झुमके, रिंग, शंख यासह विविध प्रकारचे दागिने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. सोने 90 हजार 500 तर चांदीला एक लाख रुपये किलोचा दर होता. सकाळी दुकानांमध्ये गर्दी होती तर दुपारी मात्र एक ते चारपर्यंत अत्यल्प गर्दी होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा ग्राहकांची गर्दी होती. सराफा बाजारात गुढीपाडव्यानिमीत्त पाच कोटींवर उलाढाल झाली असल्याचा अंदाज आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !