भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप : वाल्मीक कराडला जेलमध्ये एसीसह फोनची सुविधा


BJP MLA Suresh Dhas बीड (2 एप्रिल 2025) : भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडवर निशाणा साधत गंभीर आरोप बीड दौर्‍यात केला. ते म्हणाले की, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात एसी रुम व फोनची सुविधा उपलब्ध करून दिल्याने कराड हा जेल प्रशासनाचा जावई आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मग यांना का नाही हलवले ?
सुरेश धस बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना नियमितपणे फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे लोक मोबाईलवर बोलत आहेत. त्यांना स्वतंत्र जेवण दिले जात आहे. एवढेच नाही तर त्यांना एसी रुम उपलब्ध करून दिल्याची माहितीही आम्हाला मिळाली आहे. या लोकांनी येथील तुरुंगातून अक्षय आठवले व महादेव गित्ते यांना दुसर्‍या जिल्ह्यात पाठवले. एक तुम्ही नाशिकला पाठवला व दुसरा संभाजीनगरला पाठवला. एक टीम तुम्ही पुण्याला पाठवली. मग हे वाल्मीक कराड व इतर आरोपी तुरुंग प्रशासनाचे जावई आहेत का? त्यांना इथे का ठेवले? त्यांनाही अमरावती किंवा नागपूरला पाठवा.


तुरुंगात हाणामार्‍या झाल्या. एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यात पाठवले जातात. दुसर्‍या बाजूचे लोक का पाठवले जात नाहीत? असा सवालही सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला. विशेष म्हणजे सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वीच बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महादेव गित्ते व अक्षय आठवले टोळीने वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !