दीनानाथ रुग्णालयात विवाहितेचा हलगर्जीपणाने मृत्यू : उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे सुतोवाच
Married woman dies due to negligence at Dinanath Hospital : Deputy Chief Minister warns of action पुणे (4 एप्रिल 2025) : पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली होती. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप कुटूंबियांनी करीत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घडल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईचे सुतोवाच केले आहेत.
पुण्यात शिवसेना आक्रमक
शुक्रवारी शिवसेनेकडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केले जात आहे. रुग्णालयाने 10 लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकार्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल, असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येऊन आंदोलन करू लागले आहेत.

हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकार्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पतित पावन संघटनकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं गेलं आहे. रुग्णालयाच्या अधिकार्यावर लोकांनी चिल्लर पैसे फेकले.
या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
राज्य सरकारकडून गंभीर दखल : अजित पवार
माध्यमांशी बोलतांना अजित पवार म्हणाले, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीच्या झालेल्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मी स्वतः जिल्हाधिकार्यांना ही चौकशी तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांचे म्हणणे मांडले असले तरी संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणार्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणार्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे.’अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
