मजुरांवर मुरूम कोसळल्याने दोघे ठार
Two killed as mortar falls on laborers छत्रपती संभाजीनगर (8 एप्रिल 2025) : छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणार्या मजुरांवर मुरूम कोसळल्याने दोघे मजूर ठार झाले तर तिघे जखमी झाले. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना घडली.
संग्राम नगर उड्डाणपुलाच्या शेजारी कॅपिटल ट्रेड सेंटर (सीटीसी) या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी 60 ते 70 फूट खोल मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात इमारतीचा पाया व बेसमेंटचे काम सुरू होते. मंगळवारी सकाळी या ठिकाणी 5 हून अधिक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक आमदार रोड लगतचा मुरुम ढासळला आणि तो थेट खाली काम करणार्या मजुरांवर पडला.

या घटनेत 2 मजूर ठार झाले असून, 3 जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुरूम खाली असणार्या कॉलमच्या लोखंडी गजांवर पडला. त्यानंतर मुरुम, गज व दगडांच्या एकत्रित मार लागून मजुरांचा बळी गेला, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.
