शेकडो वर्षाची परंपरा : यावल शहरात श्री बालाजींचा उद्या रथोत्सव
खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढणार ः रथोत्सव मार्गाचे डांबरीकरण, पदाधिकार्यांची पाहणी
Hundreds of years of tradition : Chariot festival of Shri Balaji tomorrow in Yaval city यावल (11 एप्रिल 2025) : शेकडो वर्षांची पंरपरा असलेला शहरातील श्री बालाजी रथोत्सव शनिवार, 12 एप्रिल रोजी साजरा होत आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रथाची स्वच्छता व सजावट तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे तर नगरपालिका प्रशासनाकडून आमदार अमोल जावळे यांच्या सुचनेवरून रथमार्गाची नदीपात्रातील स्वच्छतेसह शहरातील मार्गात थेट डांबरीकरण करण्यात आले आहे. या मार्गाची भाजपा पदाधिकार्यांकडून पाहणी देखील करण्यात आली. खडकाई नदीजवळील महाराणा प्रताप नगरातील खंडोबा महाराज मंदिराची यात्रादेखील आहे. चोपडा रस्त्यावरून बारागाड्या ओढल्या जाणार आहे. नदीपात्रात यात्रेकरीता स्वच्छता करण्यात आली.
रथ मार्गाचे डांबरीकरण
यावल शहराला ऐतीहासीक महत्व आहे. त्यात शहरात श्री बालाजी रथोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरापासुन हडकाई-खडकाई नदी पात्रातून रथ मिरवणूक निघते. यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक वर्ग येतो. सुमारे 12 टन वजनाच्या या रथाला भाविकवर्ग ओढतो. अतिशय शिताफीने रथाच्या चाकांना मोगरी लावत कसबपुर्णरित्या वळविण्यात येत असते. शनिवारी शहरात हा रथोत्सव साजरा होतो. रथाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले आहे व रथोत्सवाकरीता रथ सज्ज करण्यात आला. नगरपालिका प्रशासनास आमदार अमोल जावळे यांनी सुचना करीत रथ मार्गाचे डांबरी करण्याचच्या सूचना दिल्यानंतर मुख्याधिकारी निशिकांत गवई, अभियंता सत्यम पाटील यांच्यावतीने काम पूर्ण करण्यात आले आहे.

खंडोबाची यात्रा : बारागाड्यांचे आकर्षण
शनिवारी श्री हनुमान जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे चोपडा रस्त्यावरील खंडोबा महाराजांची यात्रा देखील आहे. महाराणा प्रताप नगरातील मंदिरातदेखील यात्रे निमित्त भाविक-भक्त दर्शना करीता येतात. सायंकाळी खडकाई नदीच्या पात्रात यात्रोत्सव आहे. चोपडा रस्त्यावरून बारागाड्या ओढण्यात येणार आहे.
रथोत्सवाचा असा आहे ईतिहास
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै.पांडुरंग धोंडू देशमुख व सहकार्यांनी 1914 मध्ये रथोत्सव सुरू केला होता. त्या काळात श्री बालाजी महाराजांची प्रतिमा आरूळ असलेला रथ रामजी मिस्त्री विनामुल्य करून दिला होता. पुजारी म्हणून वासुदेव बाबा बियाणी, राजाभाऊ नागराज, भैय्याजी अग्नीहोत्री नंतर 1973 ते 2006 या काळात रमेश शास्त्री बयाणी, नारायणराव बयाणी, बलवंत जोशी व 2006 नंतर महेश बयाणी, राजु बयाणी व सुनील जोशी पुजारी म्हणून काम पाहत आहे.
रथोत्सव मार्गाची पाहणी
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार शहरातील नदीच्या भागात व शहरात रथ मार्गाची पाहणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, व्यंकटेश बारी, मुकेश कोळी, भूषण फेगडे, राहुल बारी, अतुल चौधरी, बबलू घारू, कोमल इंगळे भाजपा पदाधिकार्यांनी केली.
