भुसावळातील शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हवी पाण्याची व्यवस्था : माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानपांची मागणी
भुसावळ (11 एप्रिल 2025) : शहरातील तहसील कार्यालयात पिण्याची पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
रणरणत्या उन्हात पाण्यासाठी हाल
भुसावळ तहसील कार्यालयात तालुकाभरातून अनेक लोक शासकिय कामासाठी येतात. अशातच आता उन्हाळा सुरू झाल्याने सध्या भुसावळसह परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमान 45 अंशावर गेले आहे. असे असतांना तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने येणार्या नागरिकांना त्रास सोसावा लागतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यक आहे.
भुसावळ तहसील कार्यालयच नव्हे तर शहरातील इतर सर्व शासकिय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रहाची विनंती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली. दखल घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.


