चाळीसगावच्या आगीत कोट्यवधींची हानी : दुचाकींसह ट्रक व मिरचीची खळेही जळाले
सुदैवाने पेट्रोल पंप वाचला : नुकसानग्रस्तांना हवी ठोस भरपाई : ठिकठिकाणाहून आले बंब

Losses worth crores in Chalisgaon fire : Two-wheelers, trucks and chilli farms also burnt चाळीसगाव (11 एप्रिल 2025) : चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात मिरची बाजारात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता हवेच्या वेगाने आगीची झळ नजीकच्या अनेक मिरचीच्या खळ्यांना बसली तर वाढत्या आगीच्या वणव्यात दोन दुचाकींसह ट्रक खाक झाला. आग नियंत्रणसाठी जिल्हाभरातून बंब पाचारण करण्यात आले. या आगीचा ठोस आकडा समोर आला नसलातरी कोट्यवधींची हानी झाल्याची भीती आहे. माय-बाप सरकारने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत आता ठोस मदतीसाठी हात पुढे करण्याची अपेक्षा नुकसानग्रस्तांना आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात मिरची बाजार आहे. या मिरची बाजाराला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेत मालाचा साठा होता. जो या आगीत जळून खाक झाला. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या आगीत एक ट्रक व दोन दुचाकीदेखील जळून खाक झाल्या. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
सुदैवाने बसली नाही पंपाला झळ
दरम्यान आग लागलेल्या घटनाशेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे. अग्निशामक दलाच्या जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागलेल्या जागेजवळच पेट्रोल पंप होता मात्र सुदैवाने झळ न बसल्याने मोठी हानी टळली.



