रावेरात पोलिसांची मोठी कारवाई : आयपीएल मॅचवर सट्टा घेणारे त्रिकूट जाळ्यात


रावेर (13 एप्रिल 2025) : शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर मॅचवर सट्टा घेणार्‍या तिघांवर पोलिसांनी कारवाई करीत एक लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याने सटोडियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सध्या आयपीएल क्रिकेटचा सीजन सुरू आहे. ही संधी साधून शहरातील काहीजण आयपीएल क्रिकेटच्या दोन मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल यशवंत जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पथकाने शनिवारी सायंकाळी 5.30 छापा टाकून रामचंद्रनगर भागातील एका घराच्या आडोशाला बसून स्लीप बुकवर आकोडे लिहिणार्‍यांना पकडले. अन्य संशयीत मात्र पोलिसांना पाहताच पसार झाला. पोलिसांनी हिरामण दगडू चौधरी व आकाश हिरामण चौधरी यांना अटक करीत त्यांच्याकडून पांढर्‍या रंगाचे जुगाराचे बुक व काही मोबाईल मिळून एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अन्य कारवाईत तिसर्‍याला बेड्या
पोलिसांनी दुसरी कारवाई रावेर शहरातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावर अमनखाँ मनसुरखॉ (उटखेडा रोड, फतेहनगर, रावेर) याच्यावर केली. अंग झडतीत पांढर्‍या रंगाचे जुगाराचे बुक व मोबाईल असा एकूण 11 रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दोन आयपीएल मॅचवर सट्टा घेणार्‍या तिघांकडून एक लाख 22 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, शिपाई प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे, विकार शेख, विशाल पाटील, सचिन घुगे, सुकेश तडवी यांनी केली. तपास नाईक कल्पेश आमोदकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !