महाजन वा सावकारे यांनाही मी पालकमंत्री म्हणून चालतो : गुलाबराव पाटील
नशिराबाद शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन
जळगाव (13 एप्रिल 2025) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन झाले असते किंवा संजय सावकारे झाले असते तरी मला चालले असते आणि या दोघा नेत्यांना कुणी विचारले असते, की गुलाबराव पाटील तुम्हाला पालकमंत्री म्हणून चालतील का तर हे दोघेही हो चालतील, असेच म्हणतील, याची मला खात्री आहे. संयम ठेवला आणि सगळ्यांबद्दल प्रेमभावना ठेवली तरच हे शक्य होते, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी रविवारी नशिराबाद येथे केले.
विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, मुळात मी निवडूनच येणार नाही असे बहुतेक राजकीय विश्लेषक म्हणायचे, मात्र लाडक्या बहिणींनी करेक्ट कार्यक्रम केला आणि मी निवडून आलो.
पुढे मंत्रिपद मिळेल की नाही याचीही गॅरंटी नव्हती. पण मंत्रिपद मिळालं, एवढंच नव्हे तर तेच खातं पुन्हा मिळालं. महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून अनेक ठिकाणी किरकोळ वाद झाले, नाशिक आणि पालघरच्या पालकमंत्री पदावरून वाद झाले. पण जळगाव जिल्ह्यात वाद झाला नाही. कुठल्याही वादाशिवाय मी सलग दुसर्यांदा जळगावचा पालकमंत्री झालो. पाटील म्हणाले, पूर्वी सव्वाचार आमदारांच्या मागे एक मंत्री होता आता सव्वा सात आमदारांच्या मागे एक मंत्री आहे. यावेळी स्पर्धा मोठी होती.


