रावेर तालुक्याला गारपीटीचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांची पाहणी ; तातडीने पंचनाम्याचे आदेश


MLA Amol Javale रावेर (13 एप्रिल 2025) :  रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे तालुक्यातील केळीसह मका व हळद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आमदार अमोल जावळे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

अवकाळी पिकाने प्रचंड नुकसान
शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पुनखेडा, पातोंडी, अंजदा, उटखेडा, भातखेडा, मुंजलवाडी, खिरवड, नेहते, दोधे, रावेर, गौरखेडा, विवरे, वडगाव, लोहारा आदी भागांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. या संकटात शेतकर्‍यांवर आर्थिक झळ बसली आहे. अनेकांची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. या पार्श्वभूमीवर रविवार, 13 रोजी आमदार अमोल जावळे यांनी संबंधित नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. स्थानिक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेत त्यांना धीर दिला.


प्रशासनाला पंचनाम्याच्या सुचना
आमदार जावळे (MLA Amol Javale)यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी शेतकर्‍यांना धीर देत शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्याचेही वचन दिले. या पाहणी दौर्‍यात तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, भाजपा पदाधिकारी सुरेश धनके, पद्माकर महाजन, हरलाल कोळी, रवींद्र पाटील, चेतन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !