ठाकरे गटाचे नेते भिडले : माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, दानवे आता आले, मीच शिवसेना वाढवली
Former MP Chandrakant Khaire छत्रपती संभाजीनगर (14 एप्रिल 2025) : छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला माजी खासदार चंद्रकांत खैरे गैरहजर राहिल्यानंतर चर्चा सुरू असतानाच खैरे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फैलावर घेत त्यांच्यावर टीका केली आहे. दानवे आता पक्षात आले मात्र मीच शिवसेना वाढवल्याचे ते म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरातील मेळाव्याला दांडी मारली हे म्हणणे अती उत्साही आहे. नागपूरमध्ये दोन महिन्यांपासून ठरलेला कार्यक्रम होता, तिकडे गेलो होतो. मात्र, कालच्या पक्षाचा कार्यक्रम असल्याबाबत मला कुणी सांगितले नाही. मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचे होते, मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकला, असे ते म्हणाले.

मला आमंत्रण नव्हते, पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला डावलून कसे चालेल. उद्धव ठाकरे संकटात आहेत, एकत्र येऊन काम करावे लागेल. कुणी गटबाजी करत असेल, तर मला हे मान्य नाही. मी मरेन, पण पक्ष सोडणार नाही. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे कुठे जातात, कोण कसे सेटलमेंट करतात मला माहिती आहे.
कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्याना फोन करतो. पक्ष मोठा करायचा यांनी सोडून दिले आबे आणि गटबाजी करत बसले आहेत. मी अजूनही काम करतो. अनेक लोक सोडून चालले आहेत, बरे नाही ते, आम्ही मदत करायला हवी, असे खैरे म्हणाले.
मेळाव्याचे अंबादास दानवेनी मला सांगितले नाही. मी उद्धव साहेबाना सांगणार आहे. तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली. हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही, मी माझे आंदोलन करणार तो करेल न करेल.
