सावद्यात पाणी समस्या सुटत नसल्याने नागरिक पालिकेत धडकले
Citizens protest against the municipality as the water problem in Sawada Not being resolved सावदा (16 एप्रिल 2025) : सावदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पवन नगर, निमजाय माता नगर, स्वामीसमर्थ नगर आदी भागात पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह स्वच्छतेबाबतीत सुधारणा होत नसल्याने नागरिकांनी पालिकेवर धडक दिली व आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले.
पाणी समस्येमुळे नागरिक संतप्त
या भागात पूर्वी ठराविक समस्या वगळता व्यवस्थित पाणीपुरवठा होत होता मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईप-लाईन टाकून त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला मात्र या नवीन पाईप लाईनव्दारे होणार पाणीपुरवठा हा येथे व्यवस्थित व पूर्ण दाबाने होत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना जागरण करावे लागते शिवाय पाणी व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. यावेळी महिला वर्गास पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी आक्रमकपणे समस्या मांडल्या.

अस्वच्छतेने आरोग्य धोक्यात
या भागात अस्वच्छता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या भागात कचरा व्यवस्थित उचलला जात नाही, कचरा उचलणारी घंटागाडी केव्हा येते व जाते समजत नाही त्यावर ध्वनीक्षेपक लावण्याची मागणी करण्यात आली तसेच गटारीदेखील भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार करण्यात आली. संपूर्ण शहरात डास वाढल्याने धुरळणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली निवेदन सावदा पालिकेचे कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी यांनी मुख्याधिकार्यांच्या वतीने स्वीकारले. पाणीपुरवठा विभागाचे अविनाश पाटील यांनी पाण्याची समस्या लवकरच दूर करू, असे आश्वासन यावेळी दिले.
