जळगाव जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनातील अधिकार्‍यांना ई-मेलवरून धमकी : अज्ञाताच्या शोधासाठी हवी एसआयटी

जळगावातील माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ; पोलीस अधिक्षकांची घेतली भेट


Jalgaon District Collector and other administration officials received threats via email: SIT needed to search for unknown person जळगाव (18 एप्रिल 2025) : जळगाव जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याच्या ई-मेलवरून धमकीचे प्रकरण गांभीर्यपूर्वक असल्याने यातील सहभागी अज्ञाताचा तत्काळ छडा लागावा म्हणून तपासासाठी ’एसआयटी’ नेमण्याचे आदेश व्हावे अशी मागणी स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली.

जळगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, नदवी टाइम्सचे संपादक मुक्ती हरून नदवी, विविध राज्यस्तरीय दैनिकांचे ब्युरो हेड विजय पाठक व ग्रामगौरव मीडियाचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे या मागणीचे निवेदन पाठवले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हत्येच्या धमकीचा मेल थेट मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाल्याने जिल्ह्यासह राज्याच्या गृह विभागात खळबळ उडाली आहे. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनाही धमकीचे मेल आल्याचे आता समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांतील अवैध वाळू वाहतूक,अन्य अवैध धंदे, त्यामुळे बिघडलेली कायदा- सुव्यवस्था व त्याविरोधात महसूल-पोलिस प्रशासनाने घेतलेली भूमिका पाहता जिल्हाधिकारी यांच्यासह यापूर्वी पोलीस अधिकारी आणि इतर प्रभावी व्यक्तींना हेतूपूर्वक टार्गेट करणारे धमक्यांचे हे आलेले मेल संदेश सहज न घेता गांभीर्याने घ्यायची गरज आहे.कारण जळगाव जिल्हा सामाजिक,धार्मिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांना असलेल्या अधिकाराचा अत्यंत कायदेशीररित्या कौशल्यपूर्वक वापर करून जिल्ह्यातील सर्वात गंभीर बाब असलेल्या अवैध वाळू तस्करांवर त्यांनी वेगवेगळ्याप्रकारे कारवाया करून अनेकांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी आजतगायत 79 एमपीडीए., सुमारे 4 हजार चाप्टर केसेस, 40-50 गुंडाना हद्दपार करणे अशा धाडशी कारवाया केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या संपूर्ण कारवाया या मेहेरबान न्यायालयात सुद्धा सामनेवाल्यांनी आव्हान देऊन सुद्धा टिकल्याने आज जळगाव जिल्ह्यातील ’क्राईम रेशो’ हा खाली आणण्यात जिल्हा प्रशासन व पोलिसांना यश आल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये.जिल्हा दंडाधिकारी म्हणून आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने एकत्रितरीत्या केलेल्या धडक मोहिम व कारवाई सत्राच्या इतंभूत बाबींचे अवलोकन करता कारवाईस पात्र ठरलेल्या अनेकांना जिल्हाधिकारी हे वैरी वाटू लागले आहेत.

पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान ?
थेट मुख्यमंत्री कार्यालयास धमकीचा ई-मेल यावा म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर हे प्रश्नचिन्ह असून गृह विभागाची थट्टा करणारा हा प्रकार दखलपात्र नाही असे म्हणणे कदाचित धाडसाचे आणि धोक्याचे ठरू शकते. जर जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा प्रभावी लोकांना गेल्या मार्चपासून धमक्या देणारे ई-मेल येत असतील आणि तेव्हापासून यातील अज्ञात निष्पन्न होत नसेल तर सामान्य नागरिकांना यातून चुकीचा बोध जाईल, असे नमूद केले आहे.

एसआयटी नेमण्याची मागणी : जळगाव जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तींना आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आलेल्या धमकीच्या ईमेलच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना आदेश होऊन या गंभीर प्रकरणाला वेळीच उघड करण्यासाठी स्वतंत्र ’एसआयटी’ नेमण्यात यावी अशी या सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !