भुसावळ विभागात चार दिवसात 454 फुकट्या प्रवाशांवर कारवाई : सहा लाख 18 हजारांचा दंड वसुल

दंड वसुलीत विशेष पथकातील टीटीआय निसार खान ठरले खरे ‘हिरो’ : रेल्वेच्या धडक मोहिमेने खळबळ


गणेश वाघ
भुसावळ (17 एप्रिल 2025) : उन्हाळ्याच्या सुट्या व लग्न सराईच्या दिवसामुळे रेल्वेत प्रवाशांची तोबा गर्दी वाढली आहे. त्यातच वाढत्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी जनरल तसेच स्लीपर डब्यातून प्रवास करीत असल्याने रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रवाशांवर डीआरएम ईती पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाद्वारे सातत्याने कारवाई केली जात आहे. विशेष पथकातील टीटीआय निसार खान यांनी 13 ते 17 एप्रिल दरम्यान 454 केसेसद्वारे सहा लाख 18 हजारांचा दंड वसुल करीत विक्रम प्रस्थापीत केला आहे. रेल्वेच्या या कारवाईने फुकट्या प्रवाशांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

निसार खान यांची कारवाईत भरारी
भुसावळातील भरारी पथकातील टीटीआय निसार खान यांनी यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी 227 प्रवाशांवर कारवाई करीत दोन लाख एक हजार 750 रुपयांचा तर 1 मार्च 2025 रोजी 179 केसेस करीत एक लाख 53 हजार 700 रुपये दंड वसुल करीत नवा विक्रम प्रस्थापीत केला होता तर 7 व 8 एप्रिलला 112 प्रवाशांवर कारवाई करीत एक लाख 42 हजारांचा दंड वसुल केला होता. त्यानंतर 13 एप्रिल रोजी 215 केसेसच्या माध्यमातून दोन लाख 74 हजार. 15 रोजी 125 केसेसच्या माध्यमातून एक लाख 40 हजार तर 16 एप्रिल रोजी 114 दोन लाख चार हजार 550 रुपयांचा दंड वसुल केला. प्रवाशांनी कटू कारवाई टाळण्यासाठी तिकीट काढून प्रवास करावा व कारवाई टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आगामी काळातही फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई होणार आहे.


अडचणींवर मात : धडक कामगिरी करीत महसूल वाढीसाठी उचलला खारीचा वाटा
पभुसावळ रेल्वे स्थानकावर दिवसभरात किमान दोनशेहून अधिक रेल्वे गाड्या थांबतात व त्यातून हजारो प्रवासी चढ-उतार करून प्रवास करतात. अनेकदा प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहून काही प्रवासी तिकीट काढणे टाळतात शिवाय जनरल तिकीटावर स्लीपर वा एसी डब्यात जावून बसतात यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. अशा प्रवाशांवर भरारी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. टीटीआय निसार खान यांनीदेखील अनेक अडचणींवर मात करीत गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा सुरू ठेवली आहे. कारवाई करताना प्रसंगी प्रवाशांकडून धमकी दिली जाते व दादागिरी केली जाते, राजकीय ओळखही सांगितली जाते मात्र या परिस्थितीतही कर्तव्यनिष्ठता व वरिष्ठ अधिकार्यांच्या पाठबळावर खान यांनी रेल्वे प्रशासनाचा महसूल वाढीसाठी खारीचा वाटा उचलला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई : टीटीआय निसार खान
पविनातिकीट प्रवाशांना पकडणे, त्यांच्याकडून दंड वसूल करणे हे आव्हानात्मक काम आहे. काही प्रवासी आपली चूक मान्य करून लगेच दंड भरतात तर काही प्रवासी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करतात. अनेक प्रवासी तिकीट नसूनही ते उलट आरडाओरड करून धमक्या देतात तर काही प्रवासी राजकीय ओळखीचा धाक दाखवतात मात्र कुठल्याही दबावाला न जुमानता आपले काम सुरू आहे व यापुढे सुरूच राहील, असे टीटीआय निसार खान यांनी सांगितले. भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय, एडीआरएम तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहिम राबवण्यात येत असल्याचेही निसार खान यांनी आवर्जून सांगितले.

योग्य तिकीटांवर करावा प्रवास : डीआरएम
रेल्वे प्रवाशांनी नियमांचे पालन करावे शिवाय प्रवासात योग्य तिकीट घेवून प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, असे भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय म्हणाल्या. तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी युटीएस अ‍ॅपचा वापर केल्यास वेळेची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेचा महसूल वाढण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न कायम असतील, असेही ‘त्या’ म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !