महिलांच्या डब्यात प्रवास कराल तर होईल तुरूंगवारी….!

भुसावळात एकाच दिवशी शंभरावर प्रवाशांवर कारवाई : प्रत्येकी तीनशे रुपयांचा दंड


If you travel in the women’s compartment, you will be imprisoned…! भुसावळ (22 एप्रिल 2025) : रेल्वेत महिलांसह तरुणींचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा म्हणून महिलांसाठी विशेष डबे रेल्वे गाड्यांना जोडण्यात आले आहे मात्र महिलांसाठी आरक्षीत असलेल्या या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी घुसखोरी करीत असल्याने अशाविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे रेल्वे स्थानक प्रमुख पी.आर.मीना यांच्या नेतृत्वात विशेष मोहिम उघडण्यात आली आहे. सोमवार, 21 रोजी पहिल्याच दिवशी शंभरावर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने प्रवाशांच्या गोटात भीती पसरली आहे. कारवाईचा धडाका असाच सुरू राहणार असल्याचे आरपीएफ निरीक्षक मीना म्हणाले.

या गाड्यांमध्ये झाली कारवाई
सोमवार, 21 एप्रिल रोजी भुसावळ स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, तापी गंगा, काशी एक्स्प्रेस, सुरत-अमरावती, नवजीवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. सोमवारी दिवसभरा 103 हून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली तर न्यायालयाने प्रत्येकी प्रवासी 300 रुपयांचा दंड या प्रवाशांना सुनावल्याने प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली.


महिला डब्यात पुरूषांची घुसखोरी
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलावर्गासाठी विशेष डबा आरक्षीत करण्यात आला आहे. महिलांसह तरुणींचा प्रवास सुरक्षित व्हावा या मागील उद्देश असलातरी जागेच्या धडपडसाठी थेट पुरूष वर्गाने येथेदेखील आपलीच मक्तेदारी समजू महिलांचे आसन बळकावल्याने महिलावर्गाला प्रवास करणे जिकिरीचे होत आहे.

एकाच दिवशी शंभरावर प्रवाशांवर कारवाई
पुरूषांची घुसखोरी मोडून काढण्यासाठी आता भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने विशेष मोहिम उघडली आहे. हिलांच्या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी आढळून आल्यास त्यांच्यावर केसेस करून रेल्वे न्यायालयात हजर केले जात आहे.
रेल्वे न्यायालयात या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे शिवाय या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईबरोबरच तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

महिला डब्यातून प्रवास केल्यास कारवाई निश्चित : निरीक्षक मीना
महिला प्रवांशासाठी असलेल्या विशेष डब्यात पुरूषांची घुसखोरी अजिबात चालू देणार नाही. स्थानकावर येणार्‍या प्रत्येक गाडीची रेल्वे सुरक्षा बलातर्फे काटेकोरपणे तपासणी करण्यात येईल व महिलांच्या डब्यात पुरूष प्रवासी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !