भुसावळातील प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीवर सहकार-लोकसहकार गटाचा झेंडा
प्रगती पॅनलचा धुराळा : निवडीनंतर संचालकांचा जल्लोष
भुसावळ (22 एप्रिल 2025) : शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत लोक सहकार गटाने 15 पैकी 13 जागा मिळवत एक हाती आपले वर्चस्व मिळवले. या निवडणुकीत प्रगती पॅनलचा पुरता धुराळा उडाला.
विकासाच्या मुद्यावर निवडणूक
गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेल्या या रणधुमाळीत प्रगती पॅनल आणि शिक्षक एकता पॅनलमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सहकार व लोक सहकार गटाने फक्त विकासाच्या मुद्याावर निवडणूक लढवली आणि पतपेढीसाठी आम्ही काय करू शकतो याबाबत सभासदांना पटवून दिल्याने सभासदांनी 13 जागा जिंकून दिल्या तर अन्य पॅनलचे दोन सदस्य निवडून आले.
सहकार लोकसहकार गटाचे विजेते संचालक
संदीप गायकवाड, कल्पेश चौधरी, किरण पाटील, अनिल पाटील, सलीम शेख, श्रीकांत मोटे, विक्रांत चौधरी, विनोद सोनवणे, सोपान पारधी, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, मीरा पाटील, ज्योती राणे, शिक्षक एकता गटाचे हरिश्चंद्र बोंडे, प्रगती गटाचे संदीप पवार.
संस्थेची घडी बसवणार
संस्थेची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित करणार आहोत. सभासदांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र राहू सहकार लोकसहकार गट पॅनल प्रमुख योगेश मोहन इंगळे म्हणाले.


