भुसावळकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा : काही भागांत 9, काही भागांत 15 दिवसांआड पाणी
भुसावळ (22 एप्रिल 2025) : शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. काही भागांना 9 तर काही भागांना 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तापी नदीतील बंधारा तुडूंब भरलेला असूनही विविध तांत्रिक कारणांनी ही परिस्थिती उद्भवली आहे.
पाणीटंचाईला नियोजनाचा अभाव कारणीभूत
नियोजनाचा अभाव, कालबाह्य यंत्रणा, जलवाहिन्यांती गळती अशी अनेक कारणे या टंचाईमागे आहेत. नगर पालिकेतर्फे विविध ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हतनूर धरणातून गेल्या आठवड्यातच आवर्तन मिळाले. तुडुंब भरलेल्या बंधार्यातील पाणी शहराला किमान 30 ते 35 दिवसांपर्यंत पुरेल, पण पालिकेची पाणीपुरवठा योजनाच कालबाह्य आहे. पालिकेने साडेपाच कोटी रुपयांचा चुराडा करूनही पाणीपुरवठ्यात सुधारणा नाही.
पाणीपुरवठ्यासाठीचा निधी व्यर्थ खर्च झाल्याची ओरड आता होत आहे. पाणीपुरवठ्याचे रोटेशनही भुसावळात विस्कळीत आहे. शहरातील जुन्या पालिका कार्यालयातील ब्रिटीशकालीन विहीर तसेच डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील विहीर अशा दोन्ही ठिकाणांवरुन टँकर भरुन अधिक टंचाई असलेल्या भागांना पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही विहिरी सध्या शहरासाठी जीवनदायिनी ठरत आहेत. खडका रोड, काझी प्लॉट, पापा नगर, पंचशील नगरात टंचाई अधिक तीव्र आहे.


