भुसावळ तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’
‘Mahilaraj’ imposed on 20 gram panchayats in Bhusawal taluka भुसावळ (23 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात आली होती. त्यात 20 जागांवर सर्वसाधारण, 8 जागांवर अनुसूचित जाती, 7 जागांवर अनुसूचित जमाती तर चार जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी असे आरक्षण निघाल्यानंतर मंगळवारी भुसावळ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली. त्यात 20 ग्रामपंचायतीवर आता महिलाराज असणार आहे.
यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी कार्यालयात निघालेल्या सोडत प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांची उपस्थिती होती. 50 टक्के राखीव असल्याने 20 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच आरक्षण काढण्यात आले. यामुळे आगामी काळात निम्मे ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण राहिल.
ईश्वरचिठ्ठीद्वारे निघाले आरक्षण
भुसावळ तालुक्यातील 39 पैकी 20 जागांवर सर्वसाधारण, आठ जागांवर अनुसूचित जाती, सात जागांवर अनुसूचित जमाती तर चार जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी असे आरक्षण सोमवारी काढण्यात आले. यातील 50 टक्के जागांवर महिला आरक्षण सोडत मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात काढली गेली. अनसूचित जाती या प्रवर्गासाठी कुर्हे प्र.न., खडके, पिंपळगाव खुर्द व खंडाळे या चार गावांमध्ये महिला आरक्षण काढण्यात आले तर अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गासाठी किन्ही, फुलगाव, साकरी, फेकरी या चार ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षण सोडत निघाली. नागरिकांचा मागास प्रवर्गातून मन्यारखेडा व ओझरखेडा या गावांचे महिला आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षण ऋजल चौधरी या आठ वर्षाच्या बालकाच्या हातून ईश्वर चिठ्ठीव्दारे काढण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे आदींसह सर्व अधिकारी, गावातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
या गावांमध्ये असेल सर्वसाधारण महिला आरक्षण
भुसावळ तालुक्यातील 39 पैकी 20 गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे. यातील दहा गावांमध्ये महिला राखीव आरक्षण काढण्यात आले. यात बेलव्हाय, वराडसीम, कन्हाळे बुद्रूक, पिंपळगाव बुद्रूक, मांडवेदिगर भिलमळी, जाडगाव, कठोरा खुर्द, अंजनसोंडे, कंडारी व शिंदी या 10 गावांमध्ये सर्वसाधारण महिला सरपंच होणार असल्याने येथे चुरशीच्या निवडणुका होतील.


