भुसावळ पालिकेत एसीबीचा सापळा यशस्वी : सहाशे रुपयांची लाच घेणारा पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुखसह तिघांना अटक
प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी स्वीकारली सहाशे रुपयांची लाच
Three people, including Bhusawal Municipality water supply engineers, caught by ACB भुसावळ (23 एप्रिल 2025) : प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी तडजोडीअंती सहाशे रुपयांची लाच स्वीकारणार्या भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील दोन कर्मचार्यांना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. बुधवारी सायंकाळी पालिकेच्या फिल्टर हाऊसमध्ये हा सापळा यशस्वी झाल्यानंतर पालिकेच्या लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, लिपिक शांताराम उखर्डू सुरवाडे (57) व शाम समाधान साबळे (28) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
46 वर्षीय तक्रारदार हे प्लंबर आहेत. त्यांचे प्रत्येक वर्षाला लायसन्स नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी तक्रारदार हे पाणीपुरवठा विभागात गेल्यानंतर शाम साबळे यांनी बुधवारी सातशे रुपयांची लाच मागितली व साबळे यांनी पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सहाशे रुपये लागतील, असे सांगितले. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सुरूवातीला लिपिक शांताराम सुरवाडे यांनी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व नंतर दोन्ही आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. आरोपींविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




आरोपींकडून मोबाईल व रोकड जप्त
आरोपी शाम यांच्याकडील मोबाईल तसेच अभियंता देशमुखकडील मोबाईल व दोन हजार 160 रुपये तसेच सुरवाडे यांच्याकडील एक हजार व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी देशमुखच्या घराची झडती घेण्यात आली असता काहीही आढळले नाही.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहा पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, चालक सहा पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, महिला हवालदार शैला धनगर, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.