केळीची बाग शॉट सर्किटने जळाली : शेतकर्याला लाखोंचा फटका
साकळी शिवारातील घटना : प्रशासनाकडून ठोस भरपाईची मागणी
Banana orchard burnt due to short circuit : Farmer loses lakhs डांभूर्णी, ता.यावल (23 एप्रिल 2025) : शेत-शिवारातून गेलेल्या वीज कंपनीच्या विद्युत तारामध्ये घर्षण होवून पडलेल्या ठिणगीने केळी बागेत आग लागून शेतकर्याचे सुमारे सात लाखांवर नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानंतर शेतकर्याला मोठा धक्का बसला आहे. शेतकर्यानी प्रशासनाकडून भरपाईची मागणी केली आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला
गावातील रहिवासी लक्ष्मण सांडू कोळी यांच्या मालकीची शेत जमीन गट क्र. 317 ही साकळी शिवारात आहे. शेतात त्यांनी केळीची लागवड केली होती मात्र वेगाने वाहणार्या वार्यांमुळे विद्युत तारांमध्ये घर्ष होवून शॉर्ट सर्किट झाले व आगीचे गोळे शेतात पडल्यानंतर आग लागून चार हजार पाचशे केळी खोडांसह ठिबक नळ्या, पाईप व पत्तीने झाकलेली केळी संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेत शेतकर्याचे सहा-सात लाखांचे नुकसान झाले.
शेतकरी संकटात
कापणी योग्य केळी जळून खाक झाल्याने डोईवर कर्जाचा डोंगर उभा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे केळीची बाग उभी करतांना लागलेला इतर खर्च पाहता मशागती, खतांचा खर्च, फवारणी अशा अनेक बाबींच्या केळी उत्पादनातून फेडण्यात येणार होत्या मात्र आगीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी दुहेरी संकटात आहे. शेतकर्याने यावल तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यावल, विद्युत अभियंता डांभुर्णी, आमदार चंद्रकांत सोनवणे तथा यावल पोलिसांत 10 एप्रिल रोजी निवेदन दिल आहे. साकळी येथील तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला मात्र पंधरवडा उलटॅनही कुठल्याही अधिकार्यांकडून शेतकर्याच्या हिताबाबत विचारणाही झाली नाही विद्युत अभियंता राहुल पाटील यांनी शेतातील नुकसानीबाबतीत पाहणी व चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे सांगितले.


