भारताच्या नंदनवनात दहशतवादी हल्ला : काळ बलवान असल्याने भुसावळातील 22 पर्यटक बचावले
Terrorist attack in India’s paradise : 22 tourists from Bhusawal survived as time was of the essence भुसावळ (24 एप्रिल 2025) : पहेलगामच्या बॅसरन खोर्यात मंगळवारी दिवसभर निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे नियोजन भुसावळातील सिंधी समाजाच्या 22 पर्यटकांच्या ग्रुपने केले होते. सोमवारी हा ग्रुप कटारा येथून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेहलगामकडे ट्रॅव्हलरने निघणार होते. नियोजनानुसार सोमवारी रात्री पहेलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्काम करुन मंगळवारी सकाळी सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या बॅसरन खोर्यात दिवसभर पर्यटनाचा आनंद घेण्याचे नियोजन होते. मात्र सोमवारी रामबन जवळ भुस्खलन झाल्याने या ग्रपुने पर्यायी राजोरी या मार्गाने प्रवास सुरु केला. हा मार्ग 450 किलोमिटरचा अर्थात 100 किलोमीटर फेर्याचा मार्ग होता. या मार्गावरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नियोजीत वेळेपेक्षा 8 ते 10 ता उशिर झाला. पर्यटक सोमवारी रात्री पहेलगामध्ये पोहचू शकले नाहीत. यामुळे सुदैवाने भुसावळातील 22 पर्यटकांचा जीव वाचला. दरम्यान यापैकी 12 पर्यटकांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. ते बुधवारी सायंकाळी अमृतसरला पोहोचले तर उर्वरीत 10 पर्यटक श्रीनगरपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहल रद्द करुन परतीचा प्रवास
भुसावळातील 22 पर्यटकांनी 19 एप्रिलला प्रवास सुरू केला. यातील 12 सदस्य शहरातील आहूजा प्लायवुडचे संचालक अमीत आहूजा यांच्या परिवारातील आहेत तर उर्वरित 10 जणांपैकी काही भुसावळातील व इतर त्यांचे नातेवाईक आहेत. 5 रात्र 6 दिवस असा टूर शहरातील सिंधी समाजातील एकाने नियोजित केला होता. भुसाळातून दिल्ली, कटरा, पेहलगाव, गुलमर्ग, श्रीनगर येथून 25 एप्रिलला परतणार होते. दहशतवादी हल्ल्याने त्यांनी अर्ध्यातूनच टूर रद्द करुन माघारी येण्याचा निर्णय घेतला.




60 जणांचे बुकींग रद्द
27 एप्रिल रोजी शहरातील एका डॉक्टर परिवाराचा श्रीनगर, पेहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, वैष्णोदेवनली असा आठ दिवसांचा पर्यटन दौरा होता. तो त्यांनी रद्द केला. यासोबतच 20 मे रोजी 15 जणांच्या ग्रुपनेही जम्मू काश्मीर दौरा रद्द केला आहे तर 10 मे रोजी जाणार्या 22 जणांनीही बुकींग रद्द केली. एप्रिल ते जून दरम्यान 60 जणांचे बुकींग रद्द झाल्याची माहिती विणा वर्ल्डचे एजन्सीचे संचालक अनिरुध्द कुलकर्णी यांनी दिली.
38 जणांची यात्रा अनिश्चित
शहरातील डिगंबर यात्रा कंपनीच्या माध्यमातून 6 मे रोजी 40 जणांचा ग्रुप जम्मु काश्मीर परिसरात टूरवर जाणार आहे. यातील दोन जणांनी आपले बुकींग बुधवारी रद्द केले. तर उर्वरित 38 जण आगामी स्थिती पाहून सहलीचे नियोजन करणार आहे. तेथील हॉटेल व्यावसायीकांनी अजून काही दिवस प्रतीक्षा करुन स्थिती पूर्वपदावर येण्याबाबत आशा व्यक्त केल्याने अद्याप बुकींग रद्द करण्यात आले नसल्याची माहिती संचालक किशोर शिंपी यांनी दिली.
पुण्याचे सहा प्रवासी सुरक्षीत
शहरातील गजानन टूर्स ट्रॅव्हलचे संचालक मनीष भंगाळे यांनी सांगितले की, आमच्या यात्रा कंपनीच्या माध्यमातून पुणे येथील सहा जण जम्मु काश्मीर सहलीवर आहेत मात्र ते मंगळवारी श्रीनगरला होते. हे सहा पर्यटक सुरक्षीत असून ते परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जम्मू काश्मीर, लद्दाख, शिमला, कुलू, मनाली या परिसरात जाणार्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. या हल्ल्यानंतर भितीमुळे ते कमी होईल.
भुस्खलनामुळे जीव वाचला
सहलीच्या नियोजनानुसार दहशतवादी हल्ला झाला, त्या बॅसरन खोर्यात आम्ही मंगळवारी दिवसभर पर्यटन करणार होते मात्र ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने सोमवारी रात्री ऐवजी आम्ही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पहेलगामला पोहचलो. शहराच्या बाहेर दोन किलोमीटर अंतरावर एका पेट्रोलपंपावरच हल्ल्याची माहिती मिळाली. यामुळे पहेलगामला न जाता आम्ही रात्री श्रीनगरला पोचलो. पुढील सर्व नियोजन रद्द करुन बुधवारी सकाळी 12 जणांचा ग्रुप परतीच्या प्रवासाला निघाला आहे. तर उर्वरित दहा जण श्रीनगरात सुरक्षीत असल्याचे भुसावळातील व्यापारी ब्रिजलाल आहुजा म्हणाले.