वारंवार ‘सिक लिव्ह’ वर जाणारे तीन फौजदार निलंबित

Three soldiers suspended for repeatedly going on sick leave नागपूर (25 एप्रिल 2025) : शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलातील तीन फौजदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर न करता वारंवार ‘सिक लिव्ह’ घेणे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन उपनिरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांवरून तीनही उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
निशा गवळी, महेश पवार व वैशाली सोळंके अशी कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत.

बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील कारभाराची चाचपणी केली. तसेच तक्रारदारांशीदेखील संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांच्या कार्यप्रणालीबाबतदेखील पाहणी केली.
काही अधिकारी ‘सिक लिव्ह’ घेऊन कामावर गैरहजर असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. पोलीस आयुक्तांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तीनही उपनिरीक्षकांनी ‘सिक लिव्ह’वर जाताना कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर केली नव्हती. अधिकारी कर्तव्य टाळण्याच्या उद्देशाने जाणुनबुजून ‘सिक लिव्ह’ घेत असल्याची बाबदेखील यातून समोर आली.

