मोक्काची कारवाई झालेल्या गुंडाचा निर्घृण खून

Brutal murder of a gangster who was subjected to Mokka’s action इस्लामपूर (25 एप्रिल 2025) : परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत व मोक्काची कारवाई झालेल्या गुंडाचा मारेकर्यांनी दुपारी दीडच्या सुमारास धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. नितीन संजय पालकर (35, रा.किसाननगर, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. माव्याच्या पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नितीन याने आपली स्वत:ची टोळी निर्माण केली होती. शहरातील गुन्हेगारीवर वर्चस्व ठेवण्यासाठी त्याच्या टोळीकडून अनेक वेळा दहशत माजवण्याच्या घटना घडल्या आहेत.

गुरुवारी दुपारी तो वाळवा बझारच्या बाजूला असलेल्या टपर्यांसमोर आला होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, छातीवर वर्मी वार केले. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने या परिसरात नागरिकांची गर्दी होती. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात ही घटना घडली. यावेळी तेथे असलेल्या नागरिकांची पळापळ झाली.
पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक संजय हारुगडे हे घटनास्थळी पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम त्यांनी सुरू केले.
करण आनंदा जाधव याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पान टपरीचालक यश महेश माने (वय 20) आणि वैभव दत्तात्रय थोरात (वय 21, दोघे रा. इस्लामपूर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली.
