भुसावळात शहरात 1 रोजी माहेरवाशिणींसाठी सांस्कृतिक उत्सव
Cultural festival for Mahervasinis on 1st in Bhusawal city भुसावळ (27 एप्रिल 2025) : शहराचे माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्या माध्यमातून माहेरवाशीण भगिणींसाठी भव्य मनोरंजनाचा सोहळा म्हणून 1 मे रोजी शहरातील कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माहेरवाशीण भगिनींसाठी विविध पारंपरिक व करमणुकीच्या स्पर्धा होतील.
नऊवारी नेसणार्या महिलांना बक्षीस
या कार्यक्रमात गायन, वेशभूषा, उखाणे, ग्रुपडान्स अशा अनेक स्पर्धांसोबत झोके आणि आखाजीच्या गाण्यांची स्पर्धा हे प्रमुख आकर्षण असेल. विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. नऊवारी परिधान केलेल्या महिलांना खास वस्तू भेट दिली जाणार आहे. महिलांच्या सहभागाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. कार्यक्रमाला येणार्या महिलांसाठी बैलगाडीने आगमनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील पाच ठिकाणी माहेरवाशीणींसाठी बैलगाडीची खास व्यवस्था करण्यात आली आहे, हे यंदाच्या आयोजनाचे विशेष वैशिष्ट्य आहे.
यांची असेल उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते होईल. यावेळी शोभा नाटकर, पुष्पा आवटे, प्रतिभा पाटील, अनिता सपकाळे, अनिता आंबेकर, दीपाली बर्हाटे, वैशाली मराठे यांच्यासह अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मीना युवराज लोणारी व युवराज लोणारी यांनी केले आहे. शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


