अल्पवयीन मुलीवर दोन वेळा अत्याचार नंतर नराधमाने केली हत्या

Minor girl raped twice and then murdered by a man पुणे (26 एप्रिल 2025) : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वेळा अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. ही घटना पुण्यातील खेड तालुक्यातील एका गावात घडली.
नराधमाने या अल्पवयीन मुलीला शेतात नेत तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर तिचा खून केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, खेड तालुक्यातील अशा घटना घडू नयेत म्हणून सोमवारपासून शाळेतील मुलीसोबत संभाषण करण्याच्या सूचना बिट मार्शल दामिनी पथकाला दिल्या आहेत. त्याचसोबत 17 वर्षीय तरुणीवर हा प्रसंग घडला हा वेदनादायी आहे. आरोपीला अटक केली आहे, पोलिसांनी तपास चांगला केला आहे, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच आरोपीची चार्जशीट तात्काळ दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू, असा विश्वासही चाकणकर यांनी दिला आहे.
एका गावातील अल्पवयीन 12 वी मध्ये शिकणार्या मुलीवर नराधम नवनाथ मांजरे याने शेतात दोन वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करत आज मी स्वतः गावाला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी व गावकर्यांशी संवाद साधल्याचे चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

