जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सेवेचा प्रासाद उभारतात तेव्हा…!

अनवाणी पायांवर बरसली आभाळमाया !


जळगाव (27 एप्रिल 2025) : भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील आठ मजुरांना दौंड (जि. पुणे) येथील मुकादमाने तेथे ऊस तोडणीसाठी नेलेले होते. तीन महिने काबाडकष्ट करूनही मजुरी तर दिली नाहीच, वरून या मजुरांना कुटुंबासह मालकाच्या दावणीला बांधून ठेवले. नजरकैदेत ठेवले, हा भयावह प्रकार जनसाहस फाऊंडेशनने उघडकीस आणला आणि या मजुरांची कुटुंबासह सुटका केली. हे सगळे जण जळगावी परतले तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर आयुष प्रसाद यांनी त्यांची भेट घेतली.

मजुरांची मुले अनवाणी आहेत, हे पाहून आयुष प्रसाद गहिवरले. त्यांनी खिशातून पैसे काढले मुलांच्या मापाचे बुट मागवले आणि यादरम्यान या मुलांशी मैत्रीचे सूरही जुळवले. बुट आले. मुले आनंदली. आयुष प्रसाद यांनी स्वत: या मुलांच्या पायात बुट घातले, बरोबर होताहेत की नाही, ते पाहिले. लेस बांधल्या.

वंचितांत पाहिला विठ्ठल, लेस नव्हे ही तर बांधियेली पूजा
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील नागरी सेवा उपक्रम सुरू आहे. आता आयुष प्रसाद यांच्या या उत्स्फूर्त सेवेचे काय स्टॅटिस्टिक्स? आकड्यात ती कशी मोजणार? संत गाडगे बाबा कर्मकांडांना वजा करून पुण्यकर्माची व्याख्या करताना म्हणत, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, बेकारांना काम, दु:खी व नैराश्यग्रस्तांना हिम्मत देणे, हेची खरे दान आणि जो हे करतो तोच ज्ञानवान

जळगाव जिल्ह्यातले ऊन अनवाणी मुले त्यांची इवली इवली, नाजुक पाऊले पायात काही नसेल तर किती पोळतील, या विचारानेच कलेक्टर कळवळले! खरेतर ते या मुलांच्या बुटांच्या लेस बांधत होते तेव्हा दोर्‍या नव्हे, तर वंचितांची, पीडितांची पूजाच बांधत होते!

साहेबांच्या हातून जेव्हा घडते ऐसी सेवा
डोक्यावर आशीर्वाद खुद्द, बाबासाहेब देतात तेव्हा
वंचित हाच विठ्ठल मानून देशभरातील या दरिद्रनारायणांची पूजा बांधणारे, त्यांचे उत्थान साधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची या भिंतीवरील प्रतिमाही जणू या प्रसंगात प्रसन्न झालेली होती. दौंडमधून एका मस्तवालाच्या तावडीतून सुटका करून परत आणल्या गेलेल्या मेहंदळे (ता. भडगाव) येथील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील या इवल्या-इवल्या अनवाणी विठ्ठलांच्या पायांत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे बुट घालत होते, बुटाची लेस बांधत होते. देशाच्या प्रशासनात असेही अधिकारी आहेत, याबद्दल आश्वस्त करणारे हे चित्र पाहून बाबासाहेबांच्या छायाचित्रालाही जणू एक आगळीच आभा आलेली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !