काही लोक मला ‘गोडबोले’ म्हणतात पण खरेतर मी एक सात-बारा अधिकारी !
जिल्हाधिकार्यांची प्रेरक मुलाखत ; पत्नी डॉ.इंद्राणी यांच्या पॉडकॉस्टचे आयुष प्रसाद ठरले पहिले गेस्ट !
Some people call me a ‘sweet talker’, but in reality I’m a seven-twelve officer! जळगाव (30 एप्रिल 2025) : शेत-जमिनीच्या उतार्याला उत्तरेत खसरा म्हणतात, इथे महाराष्ट्रात सात-बारा म्हणतात मीही एका अर्थाने सात-बारा अधिकारी आहे. शेती, शेतकर्यांबद्दल मला कळवळा आहेच. जिल्ह्यातील सर्वच घटकांबद्दल आहे. त्यासाठीच मी सकाळी सातपासून ते रात्री 12 पर्यंत सतत कार्यरत राहातो. लोकांबद्दल असलेली संवेदनशीलता या कार्यसातत्यासाठी मला भाग पाडते हे उद्गार आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे.
काही लोक मला इथे जळगावात गंमतीने गोडबोले म्हणतात, पण मी कटू, कडू बोलावे अशी जर त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होणार नाही. समस्या घेऊन प्रशासनाच्या दारी आलेल्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्या व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा राखणे, त्या व्यक्तीशी बोलताना जिभेवर गोडवा राखणे, त्याला दिलासा देणे हे माझे कर्तव्य आहे ते मी बजावणार, असेही आयुष प्रसाद बोलून दाखवतात.
त्यांच्या पत्नी डॉ. इंद्राणी यांनी पब्लिक ड्युटीज अँड पर्सनल इन्साईट्स शीर्षकांतर्गत पोडकॉस्ट सुरू केले आहे. पोडकॉस्टचा शुभारंभच डॉ. इंद्राणी यांनी त्यांच्या पतीची मुलाखत घेऊन केला. ही मुलाखत स्वाभाविकपणे काहीशी कौटुंबिक स्वरूपाची वाटत असली तरी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्या युवकांसाठी ती निश्चितच प्रेरक ठरत असल्याची तसेच अधिकारी म्हणून तसेच व्यक्ती म्हणून आयुष प्रसाद यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडण्यातही यशस्वी ठरलेली आहे. स्पर्धा परीक्षांचे अशात बदललेले स्वरूपही आयुष प्रसाद यांनी विषद केले. विशेषत: यूपीएससीसाठी प्रयत्न करायचा तर मुळात तुमचे व्यक्तिमत्व कसे असले पाहिजे, त्याचा उलगडाही केला.
एका प्रश्नाच्या उत्तरात, मी म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मी असे आयुष प्रसाद यांनी स्वत:ला राष्ट्राशी एकरूप केले. ते म्हणाले, माझी मुळे उत्तरेतली. मी वाढलोय दक्षिणेत आणि काम करतोय देशाच्या मध्य भागी म्हणजेच महाराष्ट्रात! मेन स्ट्रिम देशाच्या मुख्य ठिकाणांवर राहिल्याचा फायदा मला असा झाला, की मी बहुभाषिक झालो. वैविध्यातील एकत्वाची प्रत्यक्ष अनुभूती मला घेता आली.
जळगावचे उन म्हणजे सोने !
पुण्यानंतर मी जळगावात रुजू झालो. जळगावचे उन लोकांना नकोसे असते. मी म्हणतो, जळगावच्या या उन्हात माणसाचे तावून-सलाखून सोने होते. जळगावचे हे उन त्यामुळे सोनेच आहे.
आयुष प्रसाद कोण आहे, या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनाच्या व्यवस्थेत 2015 बॅचचा अधिकारी अशी माझी ओळख आहे. मी एक मुलगा. एक पती आहे. तुमचे ध्येय काय, या प्रश्नाला, जिल्हाधिकार्यांनी, मला जे जग उपलब्ध झाले, ते अधिक सुंदर करून सोडणे, असे उत्तर दिले. पत्नी म्हणून मी तुमच्यातली संवेदनशीलता अनुभवतेच, पण तुम्ही संवेदनशील आहात, असे अनेक जण म्हणतात. कोठून आलीय तुमच्यात ही संवेदनशीलता? या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणतात, मी लोकांमध्ये असतो, त्यांच्यासाठी काम करतो म्हटल्यावर मी संवेदनशील असायलाच हवे. मी संवेदनशील नसेल तर उत्तम असे काही घडूच शकणार नाही.
माझ्या संपर्कात समाजाच्या तळागाळापासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंतचे लोक येतात. मी या सार्यांशी बोलताना माझ्या वाणीतील माधुर्य कधी हरवू देत नाही. यातून काही लोक मला ‘गोडबोले’ही म्हणून हिणवतात, पण त्याने काही फरक पडत नाही. जिल्हाधिकारी म्हणून माझ्या पुढ्यात समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीशी मी मधूर बोलणे, ही पहिली अट आहे. आपले म्हणणे शासनाकडून आत्मीयतेने ऐकले गेले, याचे समाधान तुम्ही कुठल्या परिमाणात मोजू शकत नाही. संवेदनशील असणे म्हणजे काय तर समोरच्याची गरज, निकड टिपता येणे आणि माझे म्हणणे आहे कुठलेही तुम्ही अगदी उद्योजकही झालात तरीही ग्राहकांची गरज तुम्हाला टिपावीच लागेल.
तुम्ही एक उत्तम अधिकारी आहात काय, या प्रश्नावर आयुष प्रसाद म्हणाले, दिलेले टार्गेट हे आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. वेळेची पर्वा केली नाही तरच कुठलेही टार्गेट पूर्ण करता येते. एखादी समस्या सोडवायची असेल, आव्हान पेलायचे असेल तर प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला कायद्याच्या चौकटीतच त्यासाठी आवश्यक कृती करावी लागते.
तुम्ही चौथ्या पिढीचे प्रशासकीय अधिकारी आहात, यावर काय सांगाल, या प्रश्नावर आयुष प्रसाद म्हणाले, मी यातील केवळ आई, वडिलांना बघितले आहे. मुख्य म्हणजे चार पिढ्या काही ठरवून या क्षेत्रात आलेल्या नाहीत. हा केवळ आणि निव्वळ योगायोग आहे. मी तर आयआयटीसाठी जेईईची तयारी केलेली होती. तिथे यश मिळाले नाही, पण मी खचलो नाही आणि यूपीएससीत यश मिळाले. आयआयटीसाठी जेईईचा प्रयत्न करतानाही स्वत:साठी पैसे मिळविण्याचा हेतू नव्हता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्टार्टअप सुरू करून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईन, हे ध्येय त्यामागे होते. यूपीएससी देतानाही लोकसेवा आणि देशसेवा हीच ध्येये होती. कलेक्टर म्हणून मी माझा लाभाचा कधीच विचार करत नाही, समष्टीच्या कल्याणाचा विचार करतो. जी संधी मिळाली ती अशी पार पाडायची, की जिथे संधी मिळाली तिथे छाप सोडायची
आठ लाख 15 हजार घरे पतीसह पत्नीच्याही नावे
याआधी मी पुण्यात होतो. तेथे महिला सशक्तिकरणाच्या अंगाने मला मोठे काम उभे करता आले. घरगुती हिंसाचाराचा आम्ही प्रशासन म्हणून उत्स्फूर्तपणे वेध घेतला. सर्वेक्षण केले. बचत गट, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली. 938 केसेस शोधल्या. 50 टक्के वाद मिटवले. मोजके वाद घटस्फोटापर्यंत गेले. मुले आणि घर हे पती-पत्नी समन्वयाचे मुख्य घटक असतात. यातूनच पुणे जिल्ह्यात घर दोघांचे ही संकल्पना राबवली. ग्रामीण भागातील 9 लाख 27 हजारांपैकी 8 लाख 15 हजार म्हणजे जवळपास 89 टक्के घरे पती-पत्नी असे दोहोंच्या नावावर करण्यात प्रशासन म्हणून यश मिळवले, हा दाखलाही जिल्हाधिकार्यांनी दिला.
दरमहा 160 बैठका
दर महिन्याला 160 बैठका माझ्या अध्यक्षतेखाली होतात. सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना सोबत घेऊन कार्य, मोहीम पार पाडायची असते.
लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेऊन त्यानुसार काम करणे, हे एक आव्हान असते, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
‘यूपीएससी’साठी प्रयत्न करताय तर हे जाणून घ्या
जिल्हाधिकार्यांनी सांगितले, यूपीएससीची महत्त्वाकांक्षा बाळगणे निश्चितच एक उत्तम पर्याय आहे, पण यासाठी सातत्य आणि संयम हे दोन गुण तुमच्यात आहेत काय, ते आधी तपासा- वरवर अभ्यास करायचा तर इथे स्कोप नाही. तुम्हाला सिलॅबस कम्प्लिट करावाच लागेल. नवी विद्याक्षेत्रे विस्तारत असताना या सिलॅबसचे बदललेले स्वरूपही तुम्हाला समजून घ्यावे लागेल.- पुस्तके, कोचिंग, ऑनलाईन रिसोर्स हे तर वापरावेच लागतील, पण एआय सॉफ्टवेअरही यूज करावे लागतील.- सुरुवातीला यूपीएससी नॉलेज बेस्ड (ज्ञानाधारित) होती, नंतरच्या काळात ती प्लिकेशन (उपयोजनाधारित) बेस्ड बनली. आता ती नालिसिस (पृथ:करणाधारित) बेस्ड झालेली आहे.- दिवसागणीक होत जाणारे बदल तुम्हाला टिपता आले पाहिजेत. मेंटर क्षमता वाढवावी लागेल.- नवे तंत्रज्ञान. नवी भाषा, नवे लोक, त्यांची संस्कृती जाणून घ्यावी लागेल. मी महाराष्ट्रात काम करतोय म्हटल्यावर मी मराठी नुसती बोलत नाही तर मराठीतून विचारही करू लागलेलो आहे.- पुन्हा जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्यपूर्तीत आता नवनव्या गोष्टी आलेल्या आहेत. इज ऑफ लिव्हिंग आहेच, इन्व्हेस्टमेंट मोटिव्हेशनही (गुंतवणुकीला प्रोत्साहन) आवश्यक आहे. अनेक नवी आव्हाने आहेत.
मुलाखत घेणारी पत्नी, देणारे पती तर मग हे असे थोडेफार होणारच
डॉ. इंद्राणी : तुम्ही माझे पहिले गेस्ट आहात.
आयुष प्रसाद : हो मी खरोखर मी भाग्यवान आहे.
डॉ. इंद्राणी : तुम्ही कलेक्टर तर आहात, पण तुम्ही खर्या अर्थाने कोण आहात?
आयुष प्रसाद : अनेक रोल जगावे लागतात. मी मुलगा आहे. भाऊ आहे. ऑफकोर्स ! नवराही आहे!!
डॉ. इंद्राणी : तुमच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे प्रसंग कोणते?
आयुष प्रसाद : यातील एक म्हणजे लग्न, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला. आधी मी एकटा होता, आता दुकटा झालो!