पीक विमा कंपन्यांनी शेतकर्यांना वेठीस धरू नये ; शेतकर्यांचे नुकसान 100 टक्के : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पात्र कर्जदार शेतकर्यांना पीक विमा संरक्षण देण्याची जबाबदारी बँकांची : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
Crop insurance companies should not oppress farmers ; Farmers’ losses are 100 percent: Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (8 मे 2025) : शेतकर्यांचे पीक 100 टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकर्यांना वेठीस धरू नये, असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान, हंगामात नुकसान होऊनही एखादा पात्र कर्जदार शेतकरी विमा संरक्षणाखाली नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार ठरेल, असा इशारा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला.
जिल्ह्यात 6 व 7 मे रोजी वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 7235 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जळगाव तालुक्यात 1500 हेक्टर, चोपड्यात 1000, चाळीसगावमध्ये 723 आणि यावल तालुक्यात 450 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी वादळग्रस्त भागातील शेतीची पाहणी करून नियोजन भवनात आढावा घेतला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. राजू भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
आतापर्यंत 11 हजारांहून अधिक शेतकर्यांनी नुकसान भरपाईसाठी नोंद केली असून, उर्वरित शेतकर्यांनी 72 तासांच्या आत ‘14447’ या क्रमांकावर जिओ टॅगिंगसह फोटो पाठवून नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कांद्या बाग, मिरग्या बाग असा उल्लेख टाळावा. एकदा केळीचे खोड वादळाने हलले की पुन्हा उत्पादन होत नाही, हे विमा कंपन्यांनी समजून घ्यावे, असेही पालकमंत्र्यांनी बजावले. सर्व्हर डाऊन असेल, तर ऑफलाइन नोंदी घ्या पण शेतकर्यांना तत्काळ मदत पोहोचवा, असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, सर्व पात्र कर्जदार शेतकर्यांना विमा संरक्षणात समाविष्ट करणे बँकांना बंधनकारक आहे. पीक हंगामात नुकसान झाले आणि शेतकर्याला विमा संरक्षण नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.