कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान : भाजपाच्या मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Controversial statement about Colonel Sophia Qureshi : Instructions to register a case against BJP’s corrupt minister इंदौर (14 मे 2025) : सत्तेच्या मस्तीत चूर झालेल्या मध्यप्रदेशातील भाजपातील आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या वक्तव्याची दखल घेत बुधवारी आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. जबलपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली.
काय म्हणाले भाजपाचे मंत्री ?
रविवारी मंत्री इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. इथेच वादग्रस्त विधान देण्यात आले. तथापि, मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहिण म्हटले होते.

त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारहाण केली आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला त्यांची ऐशी तैशी करण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले. आता मोदीजी कपडे काढू शकत नाहीत म्हणूनच त्यांनी त्यांच्या समुदायातील एका बहिणीला पाठवले की जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले तर तुमच्या समुदायाची बहीण येईल आणि तुम्हाला नग्न करून सोडून जाईल. तुमच्या जातीच्या आणि समुदायाच्या बहिणींना पाकिस्तानात पाठवून आपण देशाच्या सन्मानाचा आणि आपल्या बहिणींच्या कुंकवाचा बदला घेऊ शकतो.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधान प्रकरणी न्यायालयाने डीजीपींना चार तासांच्या आत एफआयआर नोंदवून कारवाई करण्यास सांगितले आहे.
भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा नोंदवा. जर एफआयआर नोंदवला गेला नाही तर डीजीपींविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू केली जाईल. मंत्री विजय शहा यांचे विधान जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टीका व संताप व्यक्त होत असताना मंत्र्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पंतप्रधानांनी आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. माझ्या भाषणाकडे वेगळ्या संदर्भात पाहू नका. काही लोक त्याकडे वेगळ्या संदर्भात पाहत आहेत. त्या आमच्या बहिणी आहेत आणि त्यांनी पूर्ण ताकदीने सैन्यासोबत काम केले आहे.
