वाल्मीक कराडला तुरुंगात व्हिआयपी सुविधा : कासलेंच्या आरोपानंतर बीड कारागृहातील अधिकार्याची बदली

VIP facilities for Valmik Karad in jail: Beed jail officer transferred after Kasle’s allegations बीड (27 मे 2025) : बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला व्हिआयपी सुविधा मिळत असल्याचा दावा व्हिडिओत केल्यानंतर सरकारवर टिकेची झोड उठताच बीड कारागृहाचे उच्चपदस्थ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी लातूर येथे बदली करण्यात आली.
काय आहे कासलेंचा दावा
बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांना आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांनी एका व्हिडिओद्वारे बीड कारागृहात वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप केला होता. वाल्मीक कराडला तुरुंगात स्पेशल चहा, जेवणात चांगल्या पोळ्या दिल्या जातात. विशेषतः कराड स्वतःसह इतर कैद्यांच्या नावाने तुरुंगातील कँटीनमध्ये दरमहा 25 हजार रुपयांची खरेदी करतो. त्याला पांघरण्यासाठी 3-3 ब्लँकेट पुरवले जात आहेत. त्याचा तो गादीसारखा वापर करतो. त्याला घरच्या जेवणासह चिकन व फरसाणही पुरवले जाते, असे रणजित कासले यांनी म्हटले होते.

बक्सार मुलानी यांची बदली
रणजित कासले यांनी वाल्मीक कराडसाठी बीड तुरुंग स्वर्ग झाल्याचा आरोप करत त्याला नागपूर किंवा पुण्याला हलवण्याचीही मागणी केली होती. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता बीड कारागृहाचे उच्चपदस्थ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी लातूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोणत्या अधिकार्याची नियुक्ती होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्या जागी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडेंची 5 वर्षांत सोडवण्याची ग्वाही
रणजित कासले यांनी आपल्या व्हिडिओत धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला 5 वर्षांच्या आत तुरुंगातून सोडवण्याची ग्वाही दिल्याचाही आरोप केला होता.
