वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण : माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच संशयीतांना जामीन


Vaishnavi Hagavane dowry case : Five suspects including former minister’s son granted bail पुणे (28 मे 2025) : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणार्‍या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, सातार्‍यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव तर तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र गुन्हा जामीन पात्र असल्यामुळे त्यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.




वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणार्‍या अत्याचार व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती तर सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघेही 17 मेपासून फरार होते. 22 मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.

आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटक टाळण्यासाठी 17 मे ते 22 मे या पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. या काळात त्यांना आश्रय व मदत करणार्‍या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पलायन केलेल्या या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास या आरोपींनी मदत केली होती.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !