मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा : अंगणवाडी सेविका, मदतनिसांना दोन हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता !

मुंबई (30 मे 2025) : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तेनुसार मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यानुसार अंगणवाडी कर्मचार्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. या बैठकीस विभागीय सचिव, उपायुक्त संगीता लोंढे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषांनुसार 1400 ते 2000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

हे असतील निकष
घरपोच आहार- वृद्धी संनियंत्रण क्षमता- पूर्व शालेय शिक्षण
गरम ताज्या आहाराचे वितरण- आहार व आरोग्य दिवस साजरा करणे
पोषण उपचार व पुनर्वसन- स्थूल व खुजी बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे
असा मिळेल भत्ता
अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
मृत्यूनंतर एकरकमी अर्थसहाय्य
अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले आहेत.
ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून, त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
