रेल्वे स्थानकांवरील हमाल सेवा महागणार ; 1 जूनपासून नवे दर लागू
भुसावळ रेल्वे विभागातील सुधारित हमाली दर जाहीर
भुसावळ (31 मे 2025) : रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना! भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर सहायक (परवानाधारक पोर्टर) सेवा घेणार्यांसाठी हमालीचे दर सुधारित करण्यात आले असून, हे नवे दर 1 जून 2025 पासून लागू करण्यात येत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवरील कुलींच्या सामान देण्याच्या दरात वाढ केली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेले हे दर रविवारपासून 1 जूनपासून लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना आता अधीक पैसे सामान वाहून नेण्यासाठी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारी हे दर जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक फेरीसाठी 100 रूपये आणि प्रतीक्षा शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. यात नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, खंडवा, बडनेरा, अमरावती यासह प्रमुख स्थानकांवर हमालांकडून एका फेरीसाठी 40 किलो वजनापर्यंत 100 रूपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, पहिल्या 30 मिनिटांनंतर प्रतीक्षा शुल्क लागू होणार असून, प्रत्येक अर्ध्या तासासाठी किंवा त्याच्या अंशासाठी अतिरिक्त 100 आकारले जातील.
इतर स्थानकांवर 80 दर असेल यात हातगाडी व दिव्यांग सेवांसाठी वेगळे दर ठरविण्यात आले आहे. यात मूर्तिजापूर, पाचोरा, नांदुरा, निफाड, नवी अमरावती आदी लहान स्थानकांवर हमालसेवेचा दर प्रति फेरी 100 ठेवण्यात आला आहे. मात्र, इतर लहान स्थानकांवर मात्र हा दर 80 रूपये इतका असेल. याशिवाय, चाकांच्या बॅरोद्वारे 160 किलो वजन नेण्यासाठी 150 रूपये आकारले जाणार आहेत.
दिव्यांगांसाठी विशेष सुविधासह दर
दिव्यांग किंवा आजारी प्रवाशांना स्ट्रेचर किंवा चाकांच्या खुर्चीद्वारे नेण्यासाठी 2 हमालांमार्फत सेवा घेतल्यास 150 आणि 4 हमालांद्वारे नेल्यास 200 शुल्क आकारले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी या नवीन दरांची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे व अधिक माहितीसाठी स्थानक अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनान केले आहे.