संतापजनक : जळगावात मोकाट कुत्र्यांनी घेतला चिमुकल्याचा बळी


Outrageous: Stray dogs kill toddler in Jalgaon जळगाव (2 जून 2025) : जळगावातील अवघ्या चार वर्षीय बालकाचा मोकाट कुत्र्यांनी बळी घेतल्याने समाजमन संतप्त झाले आहे. शहरातील नागेश्वर कॉलनीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (4) असे या मृत बालकाचे नाव आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांची शहरवासीयांमध्ये भीती
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद उर्फ बॉबी त्यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना मोकाट फिरणार्‍या एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर, डोळ्याजवळ आणि गळ्यावर गंभीर जखमा केल्या, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. बालकाच्या किंकाळ्या ऐकून त्याच्या कुटुंबीयांसह शेजार्‍यांनी धाव घेतली. त्यांनी काठीने कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला केला.

नागरिकांनी प्रसंगावधान राखून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बालकाला मृत घोषित केले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित करताच कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

महापालिकेच्या कारभाराविषयी संताप
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी येऊन योग्य आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. शहरात मोकाट कुत्र्यांमुळे आबालवृद्धांमध्ये भीती पसरली असून आतातरी पालिका प्रशासनाने जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !