पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत : जाणून घ्या नेमकी बातमी
Special discount for men on ST travel: Know the exact news न्युज डेस्क । मुंबई (2 जून 2025) : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्येही ही सवलत कायम आहे. अनेक महिला या सवलतीचा लाभ घेत आहे. आता एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, महिलाच नव्हे तर पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत देण्याची घोषणा केली आहे.
एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना भाड्यात सवलत देण्यात येईल आणि ती 15 टक्के असेल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कमी गर्दी असणार्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, हा हेतू यामागे आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली.
फ्लेक्सी फेअर असे या योजनेचं नाव असून, येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणार्या अनेक लोकांना होणार आहे. उदाहरणार्थ जळगाव ते पुणे यादरम्यान लालपरी बसचे तिकिट 615 रुपये आहे. गर्दी कमी असणार्या हंगामात आधीच यासाठीचे तिकिट बुक केले, तर हे तिकिट तुम्हाला 523 रुपयांना मिळेल.
फ्लेक्सी फेअर योजना काय?
जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास प्रवासी संख्येत वाढ होऊन एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो, असा महामंडळाच्या अधिकार्यांचा होरा आहे.