10 जूनपर्यंत पेरणीची घाई नको

शेतकर्‍यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला ः


जळगाव (2 जून 2025) : यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी पाणी घरात आणि शेतीशिवारातही पाणी शिरले होते. सध्या राज्यात मान्सून मंदावला आहे. दुसरीकडे मान्सून तर आला पण पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. याबाबत हवामान खात्याच्या हवाल्याने कृषीतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

10 पर्यंत पेरणीसाठी घाई करू नये
राज्य हवामान खात्याने 10 जूनपर्यंत पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला शेतकर्‍यांना दिला आहे. दुसरीकडे पंजाबराव डख यांनी एक इंच ओलावा असलेली जमिनी पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे. 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. यावेळी मे महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जमिनीत ओलावा आहे. चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकर्‍यांना दिला आहे.

जूनमध्ये अनेक बंधारे भरतील
‘दरवर्षी मुंबईतून मान्सून येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस कमी पडतो मात्र यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मग मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुष्काळ पट्ट्यातील जिल्ह्यांसाठीही यंदा आनंदाची बातमी असणार आहे. जूनमध्ये अनेक बंधारे भरून जातील.’, असं देखील पंजाबराव डख यांनी सांगितले.

आजही राज्यात पाऊस शक्य
महाराष्ट्रात सोमवारी व मंगळवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 6 जूनपर्यंत जर जमिनीत वापसा असेल तर शेतीची कामे करून घ्यावी, असा सल्लाही जोडून देण्यात आला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकर्‍यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असे सांगण्यात येते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !