भुसावळात राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण उत्साहात
State-level RSP officer training in Bhusawal in high spirits भुसावळ (2 जून 2025) : पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या अधिकारांतर्गत सुरू असणारा आरएसपीसीडी या अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नाशिक विभागाप्रमुख डॉ.प्रदीप साखरे यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाणयांच्या मार्गदर्शनाखाली बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले.
रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर या राज्य संघटनेकडून हा विषय महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबवला जातो. दहा दिवसीय निवासी नाशिक विभागाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये झाले. या प्रशिक्षणामध्ये नाशिक विभागातील एकूण 58 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. उद्घाटन शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी चेअरमन संजय गरुड यांच्याहस्ते झाले. यावेळी बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, प्रभारी तहसीलदार जितेंद्र पाडवी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, डॉ.प्रदीप साखरे, रायगडच्या अतिरिक्त जिल्हा समादेशक पूर्वा गुरव, सांगलीचे जिल्हा समादेशक ओंकार पाटील, शिबिर अधिकारी संतोष पाटील, डॉ.संजय निकम आदींची उपस्थिती होती.
विविध सत्रात प्रशिक्षण
दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण कालावधीत सकाळ सत्रामध्ये पद कवायत, दुपारच्या सत्रामध्ये वाहतूक नियंत्रण, अग्निशमन, नागरी सुरक्षा, प्रथमोपचार या विषयाचे अभ्यास वर्ग अशा वेळापत्रकानुसार सत्रे पार पडली. प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध विषयांचे अभ्यासकांचे मार्गदर्शन देखील लाभले.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह राऊळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा महाजन, भुसावळ नगरपरिषद अग्निशमन विभागाचे भोळे, डॉ.तुषार पाटील, भुसावळ ट्रामा सेंटरचे डॉ.प्रदीप फेगडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक सैय्यद मुजफ्फर अली आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पासिंग आऊट परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होतेे. प्रशिक्षणार्थी यांना दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कालावधीमध्ये पोलीस विभागाचे ड्रील इन्स्ट्रक्टर हरीश कोळी, आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे यांनी पदकवायत व ड्रिल विषयाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले.
समारोपाला यांची उपस्थिती
समारोपास बियाणी संस्थेच्या आयुषी बियाणी, माध्यमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष तथा सचिव महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे एस.डी.भिरूड, डॉ.प्रदीप साखरे, प्राचार्य डी.एम.पाटील, प्राध्यापक संघाचे अरुण सपकाळे, बुलढाण्याचे गायकवाड, संकेत धामंदे यांची उपस्थिती होती. डॉ.प्रदीप साखरे, डॉ.संजय निकम, संतोष पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व प्रशिक्षणामधील नियोजनाचा भार पाहिला.