अंत्योदय हीच लोकसेवेची दिशा : आमदार अमोल जावळे
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीरित्या
Antyodaya is the direction of public service : MLA Amol Jawle यावल (3 जून 2025) : अंत्योदय हीच लोकसेवेची खरी दिशा असून, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात केले. प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केल्यास शासन आणि जनतेतील अंतर नक्कीच कमी होईल, असे ते म्हणाले. यावेळी यावल पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, घरकुल योजना ही ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडित आहे आणि यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकार्यांना दिला.
डोंगरकठोर्यात शिबिर
यावल तालुक्यातील महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन 1 जून रोजी डोंगरकठोरा येथील श्री खंडेराव मंदिर ट्रस्टच्या सभागृहात करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जावळे बोलत होते. या शिबिरात एकाच छताखाली 25 शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून एकूण 888 लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या.
तरच वास्तविक अंत्योदय साध्य
शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, शासनाच्या प्रत्येक यंत्रणेने पारदर्शकतेने सेवा पोहोचवली तरच वास्तविक अंत्योदय साध्य होईल.
तहसीलदार मोहनमला नाझीरकर यांनी शासन आपल्या दारी या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कटिबद्ध आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकार्यांनी परिश्रम घेतले आणि नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.
यांची शिबिराला उपस्थिती
या शिबिरास माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, श्याम महाजन, भरत पाटील, यदु पाटील, पंकज चौधरी, शरद कोळी, योगेश भंगाळे, रुपेश पाटील, डिगंबर खडसे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.