महाराष्ट्रात टेक्सटाईल विभागाला प्रथम क्रमांकावर आणणार !
‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही
गणेश वाघ
Textile sector to be ranked first in Maharashtra भुसावळ (5 जून 2025) : राज्यातील वस्त्रोद्योग उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबूतीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत असून आगामी काळात महाराष्ट्रात टेक्सटाईल विभागाला प्रथम क्रमांकावर आणणार असल्याचा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वस्त्रोद्योग ‘विभागाच्या योजना, शंभर दिवसाच्या कामकाजाचा आराखडा व अंमलबजावणी’ या विषयावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली असता ते बोलत होते. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत नुकतीच घेतली.
देशातील सर्व ब्रॅण्डचा महाराष्ट्रातून चालणार कारभार
मंत्री संजय सावकारे यांनी वस्त्रोद्योग विभागाची धुरा सांभाळल्यानंतर राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तरही दिले. ते म्हणाले की, सहकार पणन व वस्त्रोद्योग यापूर्वी एकत्र होता मात्र आता वस्त्रोद्योग विभाग स्वतंत्र झाला आहे. आगामी काळात देशातील सर्व ब्रॅण्डचा कारभार महाराष्ट्रातून चालेल या अनुषंगाने या विभागाची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
तरुणांना केले आवाहन
मंत्री सावकारे म्हणाले की, टेक्नीकल टेक्सटाईल मिशन हे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे. तरुणांनी उद्योगात यावे, असे आवाहन त्यांनी करीत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग केल्यास त्यातून मोठा लाभ मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत या माध्यमातून टेक्स टाईल पार्क, असेही ते म्हणाले.
ई पोर्टलची निर्मिती
देशाची आर्थिक घडामोड ज्या प्रमुख दहा विभागांमध्ये होते. त्यात वस्त्रोद्योग विभागाचा समावेश असून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते, असेही मंत्री सावकारे म्हणाले. या विभागाचा पदभार घेतल्यानंतर ई पोर्टल तयार करण्यात आले व महाराष्ट्रातून दुसर्या क्रमाकांचे बक्षीस आमच्या विभागाला मिळाल्याचे ते म्हणाले.
कापसाच्या मालाला स्थानिक स्तरावर मिळावी बाजारपेठ
मंत्री म्हणाले की, शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणजे वस्त्रोद्योग आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठ्यात उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकर्यांच्या कापसाला स्थानिक स्तरावरच रोजगार मिळावेत हा प्रयत्न आहे. सहा झोनमध्ये प्रत्येकी एक टेक्स टाईल पार्कची यापूर्वीच घोषणा करण्यात आली असून त्यानुषंगाने काम सुरू आहे.
मेक ईन इंडियाचे स्वप्न साकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मेक ईन इंडिया संकल्पनेला अनुसरून वस्त्रोद्योग विभागाचा कारभार सुरू आहे. या माध्यमातून देशात 7 ठिकाणी पीएम मित्रा पार्क घोषित करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्रातील अमरावती शहराची निवड करण्यात आली आहे. मेक ईन इंडिया हे पीएम नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारले जात आहे. तंत्रज्ञान व संशोधन हे वस्त्रोद्योगासाठी महत्त्वपूर्ण बाब असून त्यानुषंगाने काही संस्थांशी शासनाने टायअप (सामंजस्य करार) केले असून त्या अंतर्गत प्रशिक्षण व त्या माध्यमातून रोजगारही दिला जात आहे.
अर्बन हट संकल्पना राबवणार
नागपूर येथे अर्बन हट ची घोषणा आधीच करण्यात आली आहे.
देशभरात येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे व या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना मिळण्यासाठी आगामी काळात नाशिकमध्ये अर्बन हट संकल्पना राबवण्यात विचार आहे. शेतकर्यांनी रेशीम उद्योगाकडे वळाल्यास निश्चितपणे त्याचा लाभ त्यांना होईल, असेही मंत्री म्हणाले.
महिलांना अधिकाधिक सुविधा
वस्त्रोद्योग विभागात महिलांना अधिकाधिक सुविधा दिल्या जातात. 50 हून अधिक महिला काम करीत असलेल्या ठिकाणी महिलांसाठी पाळणाघर ही संकल्पना राबवली जाते शिवाय महिलांना सबसिडीमध्ये अधिकची पाच टक्के सुट दिली जाते.