उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ; महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल !

आमच्या व त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही : मनसेसोबतच्या युतीवर विधान


मुंबई (6 जून 2025) : महाराष्ट्राच्या मनाज जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या संभाव्य आघाडीबाबत मोठे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा होत आहे.

तर थेट बातमी देणार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी हे एका वाक्यात सांगितले आहे. याविषयी बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही. थेट बातमी देईल. माझ्या व शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणता संभ्रम नाही. माझ्या मते, संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ.




शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळली, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटले होते. आपली एवढी जुनी कार्यकर्ती का व कशासाठी शिवसेना सोडू शकते? असा प्रश्न आम्हाला पडला होता. ठीक आहे, आता हा विषय संपला आहे.

ती माझी मोठी चूक : शिंगाडे
सुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी 30 जानेवारी रोजी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता जवळपास 5 महिने झाले. ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. मागील 4-5 महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आमिष दिले नाही त्यामुळे मी त्यांची मिंधी नाही. वयाच्या 10 व्या वर्षापासून मी शिवसेनेचे काम करते. मला विभागात गटप्रमुखापासून ते विभाग संघटकापर्यंतची सर्वच पदे मला मातोश्रीमु्ळे मिळाली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !