किरीट सोमय्यांचा दावा ठरला खरा : मालेगावातील 1044 जणांचे जन्म प्रमाणपत्र निघाले बनावट
किल्ला पोलिस ठाण्यात अज्ञात दलाल, कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Kirit Somaiya’s claim proved true: Birth certificates of 1044 people in Malegaon turned out to be fake मालेगाव (11 जून 2025) : महापालिकेने बेनामी 1044 व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र वितरीत केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा खरा ठरला आहे. मनपाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला आहे. तहसील कार्यालयाचे बनावट आदेश प्राप्त करुन मनपाकडून संबंधितांनी जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी मंगळवारी किल्ला पोलिसात अज्ञात दलाल व कार्यालयीन कामाशी संबंधित व्यक्तींविरोधात फिर्याद दिली.
असे आहे प्रकरण
सोमय्यांच्या आरोपानंतर तब्बल एक आठवड्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान तहसील कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार महापालिकेने 3460 जन्म प्रमाणपत्र निर्गमित केले आहेत. मात्र, एसआयटी चौकशीत तहसीलने केवळ 3014 आदेश पारित केल्याचे कळविले होते. त्यानुसार अधिक चौकशी केली असता तहसीदारांच्या आदेशानुसार मनपाच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागाने 3014 जन्म प्रमाणपत्र वितरीत केल्याचे निष्पन्न झाले.
यातील 2416 अर्जांचे आदेश व निर्गमित प्रमाणपत्रावरील नावे समान आढळून आली आहे. उर्वरित 1044 जन्म प्रमाणपत्र कुणीतरी अज्ञात दलाल व कार्यालयीन कामकाजाशी संबंधित व्यक्तींनी संगनमत करत तहसील कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे बनावट जन्म नोंदणी आदेश तयार केले आहेत. त्यावर तहसील कार्यालयाचा शिक्का, सील, जावक क्रमांक व सही करुन बनावट आदेश मनपाच्या कार्यालयीन प्रक्रियेत समाविष्ट करत जन्म प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे करत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम चालवली आहे. लोकसभेत भाजपला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामागे मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान असल्याचा त्यांचा कयास आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे.
आरोप केलेले अधिकारीच फिर्यादी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2 जून रोजी किल्ला पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. मनपा आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवून जबाबदार अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, फिर्यादीत अज्ञातांवर जबाबदारी निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे सोमय्यांनी आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेले अधिकारीच फिर्यादी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या घोटाळ्याशी निगडीत तहसीलदार, नायब तहसीलदार व तिघा कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता मनपा अधिकार्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौथा गुन्हा दाखल
जन्ममृत्यू प्रमाणपत्र घोटाळाप्रकरणी आत्तापर्यंत हा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या गुन्ह्यात 20 आरोपी आहेत. यातील दोघांना जामीन मिळाला असून 7 जण अटकेत आहेत. तर 8 जण फरार आहे. दुसर्या गुन्ह्यात 21 आरोपींपैकी 10 जण सध्या कारागृहात आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी एका आरोपीचा मृत्यू झाला होता. चार महिलांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे. सध्या सहा जण फरार आहे. तिसर्या गुन्ह्यात पाच आरोपी असून यातील एकास जामीन मिळाला आहे. एका महिलेस नोटीस देवून सोडले असून अन्य तिघे फरार आहे. आता चौथ्या गुन्ह्यात आरोपी अज्ञात दाखविण्यात आले आहे.