भुसावळात अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली पालिकेत आढावा बैठक
समस्या ऐकून उपाययोजनांवर चर्चा

भुसावळ (13 जून 2025) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम आणि सदस्य वैदेही वाढाण यांनी येथील पालिकेला भेट देत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. ही बैठक शिवसेना (शिंदे गट) रावेर लोकसभा महिला जिल्हा प्रमुख नंदा प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
विविध विषयांवर चर्चा
या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रमुखतः स्वच्छता, अपूर्ण पाणीपुरवठा, वीज वितरणातील अडचणी, नाल्यांची स्वच्छता, आरोग्यसेवा तसेच धूळ फवारणी यावर भर देण्यात आला. याशिवाय, पोस्टमार्टमसाठी भुसावळात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना वरणगाव अथवा जळगावला जावे लागते, याचीही गंभीर नोंद घेण्यात आली.

मुख्याधिकार्यांना मुंबईत उपस्थितीचे निर्देश
पालिकेच्या कर्मचार्यांना गणवेश उपलब्ध करून देणे, या बाबतीत आयोगाच्या सदस्यांनी मुख्याधिकार्यांशी चर्चा केली. या सर्व मुद्यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॅड.मेश्राम व वाढाण यांनी मुख्याधिकारी फातले यांना बुधवार, 18 जून रोजी मुंबई येथे आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. बैठकीस पालिका रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर तसेच स्वाती माळी, मनीषा पाटील, दीपाली बर्हाटे, वर्षा तल्लारे, स्वाती भंगाळे, प्रकाश निकम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
