जुगाराच्या व्यसनापायी भुसावळात महिलेने स्वतःच्याच घरात केला घरफोडीचा बनाव  


Due to gambling addiction, a woman in Bhusawal faked a burglary in her own house भुसावळ (13 जून 2025) : जुगाराच्या व्यसनापायी महिलेनेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवले व त्यातून मिळालेली रक्कम जुगारासह अन्य खर्चात वापरली मात्र आपले नाव न येण्यासाठी महिलेने घरात घरफोडी झाल्याचा बनाव केल्याचा प्रकारात शहरात उघडकीस आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळच्या नॉर्थ कॉलनीत 10 जून रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घरफोडी झाल्याची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 11 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता, घटनास्थळाशेजारील एक घर 10 दिवसांपासून बंद असूनही तेथे कोणतीही चोरी झाली नाही तसेच फिर्यादीच्या घराचे कुलूप तुटलेले नसून ते व्यवस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांना घरफोडीच्या घटनेबाबत संशय आला आणि त्यांनी फिर्यादीच्या घरातील लोकांची सखोल चौकशी सुरू केली.


जुगारात हारली रक्कम
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांच्या आई शर्मिला चंद्रमनी शिंदे (49, रा.नॉर्थ कॉलनी एरिया, भुसावळ) यांनी सत्य सांगितले. काही दिवसांपासून त्यांना जुगार खेळण्याची सवय जडली होती. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात गमावले होते. पुन्हा जुगार खेळून पैसे जिंकण्याच्या आमिषाने त्यांनी कुणालाही न सांगता घरातील स्वतःचे आणि त्यांच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा, भुसावळ येथे तारण ठेवले. यावर गोल्ड लोन घेऊन मिळालेले पैसे त्यांनी जुगारात, आईच्या आजारपणात आणि घर खर्चासाठी वापरल्याचे सांगितले तसेच काही रोख रक्कमही जुगारात वापरल्याची कबुली त्यांनी दिली. यानंतर, त्यांनी घरफोडी झाल्याचा बनाव रचून फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांना सांगितले. यामुळे चेतन चंद्रमनी शिंदे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शर्मिला चंद्रमनी शिंदे यांनी बँकेत तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या पावत्याही बँकेकडून प्राप्त केल्या आहेत.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !