भुसावळ नगरपालिका निवडणूक : एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार

पालिकेत एकूण सदस्य संख्या होणार 50 तर प्रभाग होतील 25


Bhusawal Municipality Election : Two corporators will be elected from one ward भुसावळ (15 जून 2025)  : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच विद्यमान लोकप्रतिनिधींनी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. त्यातच नगरविकास विभागाने 10 जूनला प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर या आदेशानुसार 25 जानेवारी 2022 च्या सुधारित अधिनियमानुसार प्रभाग संख्या निश्चित केली जात आहे. अ वर्ग नगरपालिकेसाठी एक लाख लोकसंख्येसाठी 40 तर त्यावरील प्रत्येक आठ हजार लोकसंख्येमागे एक सदस्य वाढेल. अर्थात सन 2011 च्या जगणनेनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या एक लाख 87 हजार 421 असल्याने पालिकेच्या आगामी निवडणूकीत एक प्रभाग वाढून सदस्यांची संख्या दोनने वाढणार आहे. यापूर्वी 24 प्रभाग असलेतरी आता ते 25 होतील व 48 ऐवजी 50 नगरसेवक जनतेतून निवडून येतील.

प्रशासकराज संपुष्टात येणार
कोरोना महामारी व त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेची सार्वत्रिक निवडणूक रखडली. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये झाली होती. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ 26 डिसेंबर 2021 रोजी संपला. सलग साडेतीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकिय राजवट कायम आहे. मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात आगामी निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. यामुळे पालिकेत पूर्वीप्रमाणे 13 किंवा 14 जागा ओबीसीसाठी राखीव ठेवून आगामी काळातील निवडणूका होतील.

2022 मध्ये टळली निवडणूक
पालिका निवडणुकीसाठी 10 मार्च 2022 रोजी प्रभाग रचना जाहिर करण्यात आली होती मात्र राज्य शासनाने प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याबाबतचा नवीन अधिनियम मंजूर केला. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शासनाच्या नवीन अधिनियम तरतुदीनुसार प्रभाग रचनेचे निर्देश दिले. परिणामी पूर्वीची प्रभाग रचना रद्द झाली होती. आता 10 जूनच्या निर्णयाने प्रभाग रचना नव्याने केली जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

एका प्रभागात असे असतील मतदार
प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भुसावळ शहराची लोकसंख्येच्या तुलनेत प्रभागांची रचना होईल. एका प्रभागात दोन सदस्य निवडून येतील. अर्थात दोन सदस्यीय प्रभाग असेल. एका प्रभागात कमाल लोकसंख्या 7 हजार 495 असेल. ती काही प्रभाग दहा टक्यांनी कमी अधिक होऊ शकेल.

पक्षांमध्ये झाली गटबाजी
नगरपालिकेच्या सन 2016 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नव्हती. यानंतरच्या काळात जनआधारचा गटातील नगरसेवकांचा समावेश करुन स्वतंत्र राष्ट्रवादीच्या गटाची निर्मिती झाली. राष्ट्रवादीतही शरद पवार व अजित पवार असे दोन गट झाले. यातील शरद पवार गटातही माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थक व माजी आमदार संतोष चौधरी समर्थक असे दोन गट आहेत. खडसेंच्या गटात एक, दोन नगरसेवक आहेत. खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनीही नंतर भाजपमध्ये पूर्नप्रवेश घेतला होता.

2016 मधील पक्षीय बलाबल असे
भाजप (28), शिवसेना (1), जनआधार विकास आघाडी (19),
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (0)

असे राहू शकेल आरक्षण
पालिकेच्या सध्या 48 जागा आहेत. आगामी निवडणुकीत त्या 50 होतील. 50 टक्के महिला आरक्षणानुसार 25 जागांवर महिला आरक्षण असेल. भुसावळ शहरात अनुसूचित जातींची लोकसंख्या 28 हजार 542 इतकी आहे तर एस.टी. अर्थात अनुसुचित जमातीची लोकसंख्या सहा हजार 125 आहे. यानुसार अनुसूचित जातीसाठी आठ जागा, एसटी अर्थात अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षीत राहतील. ओबीसीसाठी 13 किंवा 14 जागांवर आरक्षण असेल. यातील 50 टक्के जागांवर महिला आरक्षण राहिल.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !