इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दोघांचा मृत्यू : 30 हून पर्यटक वाहिल्याची भीती

Two dead after bridge collapses on Indrayani river: Fears that over 30 tourists may have been swept away पुणे (15 जून 2025) : पर्यटकांसाठी रविवारचा दिवस घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून सुमारे 30 हून पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे. पोलिसांसह अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आतापर्यंत दोघांचा मृत्यू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले. या दुर्घटनेतून आतापर्यंत 6 जणांचा वाचवण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेत 32 लोक जखमी झालेत, त्यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दोषींवर कठोर कारवाई करणार
कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.
रविवार ठरला पर्यटकांसाठी घातवार
मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये कुंड मळा आहे. इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे वर्षविधारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा साकपूल हा जुना झालेला आहे. रविवारी दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते. त्यावेळी अचानक लोखंडे आणि काँक्रीटमध्ये असणारा पूल कोसळला आणि काही क्षणात पुलावरील सर्वजण नदीपात्रात कोसळले.
अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी तारांबळ उडाली. काही तरुणांनी पाण्यातून वाहून जाणार्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेले. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्याची गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले आहे व पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जात आहे.
पुल अत्यंत जीर्ण : प्रशासनाचे दुर्लक्ष
इंद्रायणी नदीवरील कुंडामाळा येथील पूल अत्यंत जुना झाला आहे या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली आहे. तरीही त्या ठिकाणाहून वाहने नेण्यात येत होती. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.
