दरोड्याचा डाव उधळला : पाठलाग करताना जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरकोळ जखमी : एक अटकेत, पाच आरोपी पसार


जळगाव (17 जून 2025) : गस्तीवर असलेल्या जळगाव गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह कर्मचार्‍यांना इनोव्हा वाहनात होत असलेल्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्यांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकाने वाहन सुसाट अकोल्याच्या दिशेने पळवले मात्र सर्वत्र जाहीर करण्यात आलेल्या अलर्टनंतर अकोल्याजवळ आरोपीला पकडण्यात यश आले तर त्याचे पाच साथीदार पसार झाले. पोलिसांच्या सतर्कतेने मोठा दरोडा टळला असून या कारवाईत जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील मात्र किरकोळ जखमी झाले.

अन फसला दरोड्याचा प्रयत्न
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, एपीआय अनिल जगन्नाथ जाधव, वाहन चालक हवालदार दर्शन हरी ढाकणे 15 रोजी रात्री 11 वाजता जिल्हा गस्तीवर होते. मुक्ताईनगर उपविभागात गस्त घालत असताना, अंतुर्ली ते डोलारखेडा रस्त्यावर कुंड गावात एका इनोव्हा कारमधून चार जण उतरून दरोडा टाकण्याच्या तयारीत एका घराकडे जाताना दिसले.


पोलिसांचे वाहन दिसताच, आरोपी पुन्हा इनोव्हा कारमध्ये बसून डोलारखेडा फाट्यामार्गे नागपूर महामार्गावरून भरधाव वेगाने पळून जाऊ लागले. निरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ चालक ढाकणे यांना वाहनाचा पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग करत असताना पोलिसांनी आरोपींना वारंवार थांबण्याचा इशारा दिला, परंतु इनोव्हा कार थांबली नाही. शासकीय वाहनाने इनोव्हा कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कार चालकाने शासकीय वाहनाला कट मारून पोलिस कर्मचार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सदर वाहन थांबविण्याबाबत कळवले आणि स्वतः पाठलाग सुरू ठेवला. 16 रोजी पहाटे 3.40 च्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात, अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाजवळ, नागपूर-धुळे महामार्गावर ट्रक आडवे लावून नाकाबंदी केली. नाकाबंदीमुळे आरोपींची इनोव्हा कार हळू झाली आणि बंद पडली.

पोलिस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच्या अंमलदारांनी तात्काळ आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, इनोव्हा कारमध्ये मागे बसलेले तीन आरोपी आणि ड्रायव्हर सीटजवळ बसलेला एक इसम दरवाजा उघडून पळून गेले. जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे आणि पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या झटापटीत इनोव्हा कार चालकाने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या अंगावर गाडी आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ मुका मार लागला आहे.

कार चालकाला अटक : दरोड्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी तात्काळ इनोव्हा कार चालक अरबाज खान फिरोज खान (23, रा. खदान, हैदरपुरा, आलिम चौक, अकोला) याला ताब्यात घेतले. इनोव्हा कार क्रमांक (एम.एच.30 सी.आर.4728) ची झडती घेतली असता, त्यामध्ये एक काळ्या रंगाचा चोरी केलेला बैल, एक तलवार, एक गुप्ती (धारदार शस्त्र), एक चाकू, एक लोखंडी रॉड, दोन दोर आणि काही कपडे असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आणि हत्यारे मिळून आले. हे सर्व साहित्य जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला येथे पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे.

पाच आरोपी पसार
पसार झालेल्या सैय्यद फिरोज उर्फ अनडूल सैय्यद झहीर (रा. अजमपुरा, कसारखेडा, ता. बाळापूर, जि. अकोला), अफजल (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणीपुरा, बाळापूर, जि. अकोला), इम्रान (पूर्ण नाव माहित नाही, रा. विकुंड नदी, कसारखेडा, बाळापूर, जि. अकोला), तन्नू उर्फ तनवीर (पूर्ण नाव माहित नाही, रा. काली घाणी, बाळापूर, जि. अकोला), अफरोज खान उर्फ अप्प्या (रा. कुबा मशीद, अकोट फाईल, अकोला) या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !