मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते धरणगावमध्ये 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
आरोग्य सुविधांसाठी 39 कोटी 46 लाखांचा प्रकल्प - पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Chief Minister Devendra Fadnavis lays the foundation stone for the new building of a 50-bed sub-district hospital in Dharangaon धरणगाव (20 जून 2025) : धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुक्रवारी झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदारचंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊतयांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार
या प्रकल्पासाठी शासनाकडून 39 कोटी 46 लाख 75 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, 2.5 एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.
या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली.
नवीन पोलीस ठाण्यांची मागणी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने त्याठिकाणी 50 शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
