भुसावळात महावितरणचे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासाठी सकारात्मक विचार करणार !
उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे मुंबईतील बैठकीत प्रतिपादन

Minister of State for Energy Meghna Bordikar भुसावळ (20 जून 2025) : शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही उर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. भुसावळात महावितरण मंडळ कार्यालय स्थापनासाठी फोर्ट येथील उर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी महावितरण कंपनीचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते. ही बैठक गुरूवारी दुपारी दोन वाजता घेण्यात आली.
वीज समस्यांचा आढावा
या बैठकीत भुसावळ आणि परिसरातील वीज समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी स्थानिक वीजपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करून, समस्या क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष पाहाव्यात, लोकांच्या अडचणी समजून घेत ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महावितरणच्या अधिकार्यांना दिले.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, भुसावळ शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीजपुरवठा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राच्या गरजेनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा.
या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कर्मचार्यांच्या सुविधांकडेही लक्ष देण्यात यावे तसेच कार्यालयीन कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर कार्यरत कर्मचार्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. महावितरणच्या नवीन मंडळ कार्यालयामुळे भुसावळसह परिसरातील वीज सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री बोर्डीकर यांनी व्यक्त केला. या बैठकीस महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, भुसावळ विभागातील स्थानिक उर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
