नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा राग : वडिलांच्या बेदम मारहाणीत मुलीचा तडफडून मृत्यू

Anger over getting low marks in NEET exam : Girl dies after being brutally beaten by father सांगली (23 जून 2025) : नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब पित्याने विचारल्यानंतर उलट उत्तर मिळताच संतापलेल्या पित्याने लेकीला जबर मारहाण केली व यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मन हेलावणारी संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली. विशेष म्हणजे मृत मुलीचे वडील हे शिक्षक आहेत. साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव असून, ती बारावीमध्ये शिकत होती.
काय आहे नेमके प्रकरण
मृत साधना ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील रहिवासी होती. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणार्या साधना हिला दहावीमध्ये तब्बल 92.60 टक्के गुण मिळाले होते. नुकत्याच झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते त्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. ‘’नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार?” अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा साधनाने ‘’तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्हीतरी शिकून कुठे कलेक्टर झालात?”, असं उलट उत्तर वडिलांना दिलं.

मारहाणीत तरुणी बेशुद्ध
साधनाने उलट उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधना हिला बेदम मारहाण केली. तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले. मात्र काही वेळाने त्यांनी साधना हिला पुन्हा मारहाण केली. एवढंच नाही तर शुक्रवारी रात्रभर ते तिला मारहाण करत होते. त्यानंतर दुसर्या दिवशी ते उठून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी परतल्यावर साधना ही त्यांना बेशुद्धावस्थेत दिसून आली.
आरोपी पित्याला अटक
त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधना हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारांसाठी नेले. साधना ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे सांगत त्यांनी तिला उपचारांसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वीच साधना हिचा मृत्यू झाला. त्यानंतर साधना हिचं शवविच्छेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली.